'एअर इंडिया'च्या ड्रीमलाइनर विमान अपघाताचा फटका प्रवासी संख्येला, देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत जुलैमध्ये घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 13:59 IST2025-08-29T13:58:30+5:302025-08-29T13:59:38+5:30
Air India Plane Crash Impact News:

'एअर इंडिया'च्या ड्रीमलाइनर विमान अपघाताचा फटका प्रवासी संख्येला, देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत जुलैमध्ये घट
मुंबई - एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन या विमानाला १२ जूनला झालेल्या अपघाताचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसला असून जुलैमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
'डीजीसीए'च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत यंदाच्या जुलै महिन्यात २.९४ टक्के इतकी घट प्रवासी संख्येत नोंदली गेली आहे. २०२४ यावर्षी जुलैमध्ये एकूण एक कोटी २९ लोकांनी विमान प्रवास केला होता, तर २०२५ यावर्षीच्या जुलैमध्ये १ कोटी २६ लाख लोकांनी विमान प्रवास केला आहे. या अपघातानंतर अनेक लोकांनी प्रामुख्याने देशांतर्गत मार्गावर विमानाने प्रवास टाळल्याचे प्राथमिक विश्लेषण केले जात आहे.
८१% विमानांतील आसन व्यवस्था
जूनमध्ये एअर इंडिया कंपनीच्या विमानांतील आसन व्यवस्था ८१ टक्के इतकी भरलेली होती. त्यामध्ये घट होत ती जुलैमध्ये ७८ टक्क्यांवर आली आहे. जुलैमध्ये एअर इंडियाच्या मार्केट हिस्सेदारीमध्ये एक टक्क्याने घट झाली आहे. त्या तुलनेत देशातील अव्वल विमान कंपनी असलेल्या इंडिगो कंपनीच्या मार्केट हिस्सेदारीमध्ये मात्र वाढ झाल्याचे दिसून आले.
जुलैमध्ये इंडिगो कंपनीच्या विमानांतून एकूण ८२ लाख १५ हजार प्रवाशांनी प्रवास केला. दरम्यान, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकात्ता, बंगळुरू आणि हैदराबाद या देशातील सहा व्यस्त विमानतळावर सर्वाधिक वेळेवर विमान सेवा देण्याचा मान इंडिगोने कायम राखत वेळेच्या अचूकतेचे प्रमाण ९१ टक्के इतके राखले आहे.
अपघाताचा थेट फटका विमान कंपन्यांच्या मार्केट हिस्सेदारीला देखील बसला आहे. याचा अर्थातच सर्वाधिक फटका हा एअर इंडिया कंपनीच्या विमानांना बसला आहे. या अपघातानंतर एअर इंडियाने काही मार्गावरील आपली सेवा स्थगित देखील केली होती.