एअर इंडिया इमारतीतील लिफ्ट बंद पडली; आयकरचे अधिकारी दोन तास अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 14:11 IST2019-03-20T14:10:36+5:302019-03-20T14:11:03+5:30
आयकर विभागाने वार्षिक सुमारे 48 कोटी रुपये देऊन एअर इंडियाच्या इमारतीत आपली कार्यालये थाटली आहेत.

एअर इंडिया इमारतीतील लिफ्ट बंद पडली; आयकरचे अधिकारी दोन तास अडकले
मुंबई : एअर इंडिया इमारतीतील लिफ्ट मंगळवारी रात्री अचानक बंद पडल्याने आयकर विभागाच्या अन्वेषण विभागातील वरिष्ठ निरीक्षक दर्जाचे अधिकारी त्यामध्ये दोन तास अडकून पडले होते. आपत्कालीन मदतीसाठी अलार्म वाजवून देखील कोणीही मदतीला पोचू शकले नाही. तब्बल दोन तासांनंतर लिफ्ट मॅकेनिक आल्यानंतर अधिकाऱ्याला बाहेर काढण्यात यश मिळाले. केवळ चमत्कार म्हणून अधिकारी वाचल्याचे बोलले जात आहे.
आयकर विभागाने वार्षिक सुमारे 48 कोटी रुपये देऊन एअर इंडियाच्या इमारतीत आपली कार्यालये थाटली आहेत. मात्र सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याने हे कार्यालय येथून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरुन सरकारचा कोट्यवधी रुपयांचे नुकसान थांबेल व कर्मचारी अधिकारी देखील सुरक्षित राहतील, अशी भूमिका इन्कम टैक्स एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
प्रशासनाचे या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी दुपारी एअर इंडिया इमारतीतील आयकर विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली.