विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाईचे कृषिमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 15:04 IST2020-07-14T14:45:04+5:302020-07-14T15:04:50+5:30
कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश या पत्रात दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाईचे कृषिमंत्र्यांचे आदेश
मुंबई - कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.
यासंदर्भात महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात कृषीमंत्र्यांनी म्हटले आहे की, कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश या पत्रात दिले आहेत.