आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 10:19 IST2022-06-11T10:16:57+5:302022-06-11T10:19:45+5:30
राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता आगामी २० जून रोज विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता
मुंबई- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं असतानाही त्या ठिकाणी भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. मात्र शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले.
राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची जवळपास ९ मते फुटली असल्याचे समोर आले आहे. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली.
रात्रीस खेळ चाले; विधानभवनात मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?... एका क्लिकवर
राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता आगामी २० जून रोज विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या निकालानंतर नऊ दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीत चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणुकही अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्ह आहेत.
विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी १० जागांसाठी ११ जण रिंगणात असल्याने राज्यसभेप्रमाणेच रस्सीखेच बघायला मिळणार आहे. शिवसेनेने सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोघांनाही संधी नाकारत सचिन अहिर व नंदुरबारचे जुने शिवसैनिक आमशा पाडवी यांना संधी दिली आहे. भाजपाने पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा संधी नाकारली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेले राम शिंदे यांचे पुनर्वसन केले.
'वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा'; राज्यसभा निवडणूकीच्या निकालानंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया
प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय तसेच भाजपा प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष उमा खापरे यांनाही भाजपाने उमेदवारी दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा उमेदवारी देताना प्रसाद लाड यांना पाचवे उमेदवार ठेवले आहे. राष्ट्रवादीकडून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या दोन मुंबईकर नेत्यांना मैदानात उतरविले आहे.
असे आहेत उमेदवार-
शिवसेना: सचिन अहिर, आमशा पाडवी
भाजपा: प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे
राष्ट्रवादी काँग्रेस: रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे
काँग्रेस: चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप