‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 04:04 IST2025-05-13T04:04:46+5:302025-05-13T04:04:46+5:30

डेटा चोरी, महत्त्वाच्या सेवांचे वितरण विस्कळीत करणे हा या हल्ल्यांमागील मूळ उद्देश होता.

after operation sindoor the number of cyber attacks has crossed 15 lakh cyber department is investigating | ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर सीमेपलीकडून होणारे सायबर हल्ले ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अधिक तीव्र झाले आहेत. या कालावधीत एकूण १५ लाख सायबर हल्ल्याचे प्रयत्न पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियातील हॅकर टोळ्यांनी केले असून, त्यातील फक्त १५० हल्ले यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे.

डेटा चोरी, महत्त्वाच्या सेवांचे वितरण विस्कळीत करणे हा या हल्ल्यांमागील मूळ उद्देश होता. या कटाच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, हॅकर टोळ्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि निवडणूक आयोगाच्या सायबर प्रणालीवर यशस्वी हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. सायबर विभाग तपास करत आहे. 

सायबर हेल्पलाइनमुळे सहा महिन्यांत दोनशे कोटी वाचले

महाराष्ट्र सायबर विभागाच्या १९४५ आणि १९३० या सायबर हेल्पलाईनमुळे गेल्या सहा महिन्यांत दोनशे कोटी रुपये वाचवल्याचे सायबर विभागाने सांगितले. या हेल्पलाईनवर दिवसाला ७००० कॉल प्राप्त होत आहेत. २०१९ पासून आतापर्यंत ६०० कोटी रुपये वाचवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सायबर जनजागृतीसाठी महाराष्ट्र सायबरकडून चित्रफित प्रदर्शित करण्यात आली आहे.

सहा जणांची सुटका

लाओसमधून आणखीन सहा भारतीयांची  सुटका करण्यात आली आहे. सायबर गुन्हे करण्यास नकार देणाऱ्या तरुणांना शॉक देणे, त्यांची नखे काढणे,असे अत्याचार तेथे केले.

अश्लील पोस्ट 

धार्मिक भावनांना ठेच पाेहाेचवणाऱ्या अश्लील पोस्ट करणाऱ्या आराेपींना सायबर विभागाने इंदौर येथे अटक केली. आरोपी रहिम कसाई, रहिम अन्सारी, डॉ. सुजा राजपूत, रिझवान पठाण आणि वारीस पठाण या नावाच्या खात्यावरून २०२१ पासून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करत असल्याचे तपासात समोर आले. 

‘ती’ ३८ खाती ब्लॉक

लष्करी कारवायांबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या ८३ सोशल मीडिया खात्यांची ओळख पटवून त्यातील ३८ खाती ब्लॉक करण्यात आल्याचे सायबर विभागाने सांगितले. अन्य खात्यांचा तपास सुरू असल्याचेही सायबर विभागाने सांगितले.

 

Web Title: after operation sindoor the number of cyber attacks has crossed 15 lakh cyber department is investigating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.