मुंबई - महापालिका निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून त्यात महायुतीच्या बाजूने लोकांनी कौल दिला आहे. मात्र महापौर पदावरून भाजपा आणि शिंदेसेनेत छुपा संघर्ष सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपाचे यंदा पालिकेत सर्वाधिक ८९ नगरसेवक निवडून आलेत. शिंदेसेनेला ९० पैकी अवघ्या २९ जागा जिंकता आल्या. मात्र मुंबईत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपाला शिंदेसेनेची गरज भासत आहे. त्यामुळे शिंदेसेनेकडून आता महापौरपदाची मागणी होऊ लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षाचं निमित्त पुढे करत शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी महापौर आपलाच असावा अशी आग्रही मागणी केली आहे. नगरसेवकांची ही भूमिका आणि संभाव्य फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांनी सर्व नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये ठेवले आहे.
भाजपाही सतर्क
मुंबईत निकालानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना एका हॉटेलला बोलावले. तेव्हापासून हे नगरसेवक तिथेच थांबले आहेत. शिंदेसेनेच्या मदतीशिवाय भाजपाला मुंबईत बहुमताचा आकडा गाठणे कठीण आहे. त्यामुळेच शिंदेसेनेच्या नगरसेवकांचे महत्त्व वाढले आहे. तर शिंदेसेनेच्या या भूमिकेनंतर भाजपानेही सतर्क पावले उचलली आहेत. मुंबई भाजपाकडून पक्षाच्या सर्व नगरसेवकांना एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. भाजपानं त्यांच्या सर्व नगरसेवकांना मुंबईतच राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पुढील १० दिवस कुणीही मुंबई सोडून बाहेर जाऊ नये. जर एखादी आपत्कालीन परिस्थिती असेल आणि शहर सोडण्याची गरज भासत असेल तर त्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची परवानगी घ्यावी असं पक्षाने कळवले आहे. मुंबई महापालिकेत सध्या सत्तेची गणिते जुळवली जात आहे. मुंबईत महायुतीला बहुमत मिळाले असले तरी शिंदेसेनेच्या राजकीय रणनीतीमुळे भाजपा सावध भूमिका घेत आहे. २२ जानेवारीला महापौरपदाची सोडत निघणार आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत महापौरपदी कोण बसणार हे निश्चित होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या वर्ल्ड इकोनॉमी फोरमनिमित्त दावोसला गेले आहेत. निकालानंतर दुसऱ्याच दिवशी ते भारतातून रवाना झाले. २४ जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री मुंबईत परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर महापौर आणि इतर महत्त्वाच्या पदांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी एकनाथ शिंदे यांच्याकडून हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाल्याने शिंदेसेनेचे नगरसेवक कोण फोडणार आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
Web Summary : Following municipal election results, a power struggle emerges between BJP and Shinde Sena. BJP, with 89 corporators, needs Shinde Sena's support. Shinde Sena demands mayor post. BJP instructs corporators to stay in Mumbai amid political maneuvering before mayor election.
Web Summary : नगरपालिका चुनाव परिणाम के बाद, भाजपा और शिंदे सेना के बीच सत्ता संघर्ष। 89 पार्षदों वाली भाजपा को शिंदे सेना के समर्थन की आवश्यकता है। शिंदे सेना ने महापौर पद की मांग की। महापौर चुनाव से पहले राजनीतिक पैंतरेबाज़ी के बीच भाजपा ने पार्षदों को मुंबई में रहने का निर्देश दिया।