मुंबईत पावसाची ॲडव्हान्स एंट्री! नरिमन पाॅइंटला एका तासात १०४ मिमीची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 06:04 IST2025-05-27T06:03:42+5:302025-05-27T06:04:08+5:30
गेल्या २४ वर्षांत सर्वात लवकर दाखल

मुंबईत पावसाची ॲडव्हान्स एंट्री! नरिमन पाॅइंटला एका तासात १०४ मिमीची नोंद
मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाने अखेर २६ मे रोजी मुंबईत आपली ‘ॲडव्हान्स एन्ट्री’ केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्यातही मान्सूनच्या दमदार एंट्रीमुळे सोमवारी दिवसभरात मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले. गेल्या २४ वर्षांत मान्सून प्रवेशाची सर्वात लवकर अशी नोंद ठरली आहे.
सोमवारचा दिवस पावसाच्या रौद्र रूपासह उजाडल्याने अनेक सखल भागात पाणी साचले. सकाळी ११ वाजेपर्यंत नरिमन पॉइंट परिसरात अतिवृष्टी झाल्याचे स्पष्ट झाले. तेथे सकाळी ९ ते १० अशा अवघ्या एका तासांत तब्बल १०४ मिमी पावसाची नोंद झाली, तर मध्यरात्रीपासून सकाळी ११ पर्यंत पावसाने २०४ मिमीची पातळी गाठली. मुंबई शहर व उपनगरात रात्रीपासून सुरू असलेला जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि समुद्रास सकाळी ११:२४ वा. असलेली ४.७५ मीटरची भरती यामुळे मुंबई अनेक ठिकणी पाणी भरले.
हवामान विभागाने मुंबईसाठी २७ मे रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक गोष्ट नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. पावसामुळे केम्प्स कॉर्नरजवळ रस्ता खचण्याचा प्रकारही समोर
आला आहे.
मध्यरात्रीपासून व सकाळी ११ वाजेपर्यंत पावसाची नोंद (मि.मी.मध्ये)
नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्र २५२
ए विभाग कार्यालय २१६
महापालिका मुख्यालय २१४
कुलाबा उदंचन केंद्र २०७
नेत्र रुग्णालय, दोन टाकी २०२
सी विभाग कार्यालय (मरीन लाइन्स) १८०
मेमनवाडा अग्निशमन केंद्र १८३
ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी १७१
नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ १०३
सुपारी टँक, वांद्रे १०१
जिल्हाधिकारी वसाहत, चेंबूर ८२
एल विभाग कार्यालय, कुर्ला ७६
मुंबई, ठाण्यात आज यलो अलर्ट
मुंबईत या आधी २७ मेपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. मान्सून रविवारी तळ कोकणात व दुसऱ्या दिवशी सोमवारी मुंबईत दाखल झाला. पहिल्याच दिवशी तो जोरदार कोसळला. त्यामुळे सोमवारी सकाळी हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र, दुपारी यात बदल करत मुंबई, ठाण्यासाठी रेड अलर्ट दिला, तर मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.