"आरशात पाहिलं का? सरडा पण लाजेल"; एकनाथ शिंदेंनी टीका करताच आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 08:29 IST2025-01-10T08:27:20+5:302025-01-10T08:29:29+5:30
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला होता.

"आरशात पाहिलं का? सरडा पण लाजेल"; एकनाथ शिंदेंनी टीका करताच आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
Aaditya Thackeray on DCM Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी विरोधीपक्षनेते पद मिळण्याइतकेही आमदार निवडून आणले नाहीत. दुसरीकडे, सत्ता स्थापनेनंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आदित्य ठाकरे यांच्या या भेटीवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावरुनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना सरड्याची उपमा दिली.
महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होऊनही नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चा अद्याप सुरु आहेत. अशातच शिवसेना उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. गेल्या ३५ दिवसांतील ही त्यांची तिसरी भेट होती. मुंबईतील विविध समस्या आणि लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांसाठी ही भेट घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला आहे. सरडा रंग बदलतो पण ही नवीन प्रजाती मी पहिल्यांदाच पाहिली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सतत भेटीगाठी घेणाऱ्या आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. "हे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजींना फडतूस म्हणणारे, एक तर तु तरी राहशील नाही तर मी तरी राहील अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असं वाटलं नव्हतं. सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात मी पहिल्यांदा बघितली," अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली होती.
हे डरपोक लोक आहेत - आदित्य ठाकरे
"त्यांनी आरशात पाहिलं का? सरडा पण लाजेल. ते डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाहीत. हे डरपोक लोक आहेत. त्यांनी थोडीतरी लाज बाळगावी," असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं आहे.
कशासाठी घेतली होती भेट
मुंबईतील विविध प्रश्नांसंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटलं. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून चांगलं काम करू शकतात, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. "मुंबईत झालेल्या टोरेस घोटाळा झाला आहे, त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली. पाणी आणि पोलिसांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर पॉझिटिव्ह आहेत. आमच्या होणाऱ्या भेटीगाठी जनहीताच्या कामासाठी आहेत," असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.