२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 21:38 IST2025-07-16T21:28:03+5:302025-07-16T21:38:34+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात टेस्ला कार घेऊन आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी टीका केली.

२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
Aaditya Thackeray on Tesla Car: अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या पहिल्या कार शोरूमचे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गेल्या काही वर्षांपासून टेस्ला कंपनी भारतात येण्याची चर्चा सुरु होती. मात्र कंपनीने त्यांचा कारखाना सुरु करण्याऐवजी पहिले शोरुम मुंबईत सुरु केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट टेस्ला कार घेऊन विधानभवनात पोहोचले होते. एकनाथ शिंदेंच्या या कृतीवरुन ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली. तीन वर्षांपूर्वीच टेस्ला महाराष्ट्रात आली असती असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
प्रसिद्ध टेस्ला कंपनीचे देशातील पहिले टेस्ला शो रूम मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील पहिल्या टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरचे उदघाटन केले. वांद्रे-कुर्ला संकुलातील मेकर मॅक्सिटी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये टेस्लाचे पहिले शोरूम सुरु करण्यात आले. त्यानंतर आज ही गाडी विधानभवनात आणली असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गाडीची पाहणी करून ही चालवण्याचा आनंद घेतला. तसेच या गाडीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या फीचर्स आणि सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि टेस्ला कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावरुनच आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
"काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टेस्लाचे उद्घाटन केले तेव्हा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गाडी आणण्याची गरज नव्हती. तुम्ही केलं तर आम्ही पण करणार यातून ते घडलं. ही टेस्ला कंपनी २०२२ साली महाराष्ट्रात आली असती. तेव्हा मी सुद्धा टेस्ट ड्राईव्ह केली होती. तेव्हा केंद्र सरकारने अडचणी निर्माण केल्या नसत्या टेस्ला महाराष्ट्रात आली असती," असं आदित्य ठाकरे म्हणाले.
#WATCH | मुंबई: शिवसेना (UBT) नेता आदित्य ठाकरे ने कहा, "कल सीएम साहब ने उद्घाटन किया तो आज उपमुख्यमंत्री को लाने की जरूरत नहीं थी..जैसे मैंने कहा था कि ये टेस्ला 2022 में महाराष्ट्र में आ सकती थी लेकिन तब अगर केंद्र सरकार अड़चने नहीं डालती तब टेस्ला महाराष्ट्र में आ जाती। जो… pic.twitter.com/iGvGdNnHzy
— ANI_HindiNews (@AHindinews) July 16, 2025
"२५ लाख रुपयांना मिळणारी टेस्ला आता ६० लाख रुपयांना मिळत आहे. याला जबाबदार कोण? याचाही विचार करणे गरजेचं आहे. एकाच कार कंपनीच्या मागे जाण्यापेक्षा इलेक्ट्रिक कार कंम्पोनट आहेत त्याच्या मागे जायला हवं," असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.