Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी एकटा, तुम्ही सगळे...आमनेसामने बसू; आदित्य यांनी दिलं आव्हान, शिंदेंकडून 'वेगळाच' निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 14:49 IST

आदित्य ठाकरे यांनी आज इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

मुंबई: नांदेड रुग्णालयातील मृत्यूंबद्दल बोलायला कोणी तयार नसून राज्य सरकारने या प्रश्नावर मौन बाळगल्याची टीका राज्याचे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील हॉटेल ग्रँड हयात येथे आयोजित इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. 

एनडीए आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, इंडिया आघाडीची स्थापना फक्त पंतप्रधान मोदींचा विरोध करण्यासाठी झाली आहे. यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे साफ चुकीचे आहे. इंडिया आघाडीतील पक्षांची विचारसरणी वेगळी आहे. तरीदेखील सर्वांनी एकत्र येऊन आघाडी केली. इंडिया आघाडीत सर्वांचा आवाज ऐकला जातो. एकच व्यक्ती सर्व निर्णय घेत नाही. एनडीएमध्ये सर्व निर्णय एकच व्यक्ती घेते. तिथे कुणाचाही आवाज ऐकून घेतला जात नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. 

भाजपावर निशाणा साधत आदित्य ठाकरे म्हणाले की, आमचे हिंदुत्व पूर्णपणे वेगळे आहे. आम्ही बलात्कार करणाऱ्यांचे स्वागत करत नाही. मग ती बिल्किस बानो असो वा अन्य कोणी...आमचं हिंदुत्व 'प्राण जाए, पर वचन न जाए', या गोष्टीचं पालन करतं. जेव्हा केंद्र सरकार राम मंदिराचा मुद्दा विसरलं होतं, तेव्हा आम्हीच हा मुद्दा उपस्थित केला होता, अशी आठवणही आदित्य ठाकरेंनी करुन दिली. 

आदित्य ठाकरेंनी दिलं होतं एकनाथ शिंदेंना आव्हान-

इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचं सेशन एकापाठोपाठ एक होतं. यावर एकत्र सेशन करु, मी एकटा बसतो, त्यांच्या बाजूने येतील तेवढे येऊ द्या, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलं होतं. मात्र, एकनाथ शिंदे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. आदित्य ठाकरे यांचं सेशन संपायला आलं तेव्हा निवेदिकेनं सांगितलं की, एकनाथ शिंदेंना अचानक दिल्लीला जावं लागत असल्याने ते येऊ शकत नाहीत. 

पेंग्विन आणल्यानं महापालिकेला ५० कोटी मिळाले

आदित्य ठाकरेंची विरोधकांकडून बेबी पेंग्विन म्हणत खिल्ली उडवली जाते, यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही पेंग्विन आणल्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेला ५० कोटी मिळाले आहेत. “आम्हाला प्राणीसंग्रहालयात बरेच प्राणी मिळाले. आज किमान ३० हजार लोक प्राणीसंग्रहालयाला भेट देत आहेत. त्यातून, महापालिकेला उत्पन्न सुरू झालं. मात्र, देशात आणलेल्या चित्त्यांचे काय झाले, आधी ते पहा,” असे म्हणत विरोधक भाजपा नेत्यांना आदित्य ठाकरेंनी आरसा दाखवण्याचं काम केलं. 

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकारभाजपा