बेस्ट, टाटालाता अदाणी देणार आता टक्कर; धारावीत वीज पुरवठा करण्यासाठी स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 10:58 IST2025-11-30T10:51:39+5:302025-11-30T10:58:02+5:30
मुंबई शहराला बेस्टकडून विजेचा पुरवठा केला जातो. काही परिसरात टाटा पॉवरकडूनही वीजपुरवठा केला जातो. अदाणी इलेक्ट्रिसिटीने आता धारावी आणि संलग्न क्षेत्रात विजेचा पुरवठा करता यावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे परवाना मागितला आहे.

बेस्ट, टाटालाता अदाणी देणार आता टक्कर; धारावीत वीज पुरवठा करण्यासाठी स्पर्धा
मुंबई : मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात विजेच्या पुरवठा करणाऱ्या अदाणी इलेक्ट्रिसिटीने आता धारावी आणि संलग्न क्षेत्रात विजेचा पुरवठा करता यावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे परवाना मागितला आहे. यावर जनसुनावणी होईल. धारावीमध्ये पूर्वीपासूनच बेस्ट आणि टाटा पॉवर विजेचा पुरवठा करत आहे. आयोगाने जर अदाणीला परवाना दिला तर धारावीकरांना विजेसाठी तिसरा पर्याय उपलब्ध होणार आहे.
मुंबई शहराला बेस्टकडून विजेचा पुरवठा केला जातो. काही परिसरात टाटा पॉवरकडूनही वीजपुरवठा केला जातो. उपनगरात टाटा आणि अदाणीसह मुलुंड व भांडूपमध्ये महावितरणकडून वीजपुरवठा होतो.
चार कंपन्यांच्या विजेच्या दराची तुलना केली तर बेस्टचे दर तुलनेने कमी आहेत. टाटा, अदाणी आणि महावितरणचे दर अधिक आहेत. आता अदानी इलेक्ट्रिसिटीने भौगोलिक संग्लन धारावी क्षेत्रात (माहीम नदी व तिवरांच्या जंगलासह व जलसाठीच्या क्षेत्रासहित) विजेचा पुरवठा करण्याचा परवाना मागितला आहे.
कुणाला सूचना व हरकती दाखल करायच्या असतील तर आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ज्यांना थेट आयोगाच्या कार्यालयात हरकती द्यायच्या असतील त्यांना २९ डिसेंबरपूर्वी अर्ज करावा लागेल.
४ वीज कंपन्यांत स्पर्धा
मुंबईत वीज पुरवठा करण्याचा परवाना महावितरणनेही वीज नियामक आयोगाकडे मागितला होता. मात्र याबाबत अद्याप सुनावणी झाली नाही, असे महावितरणच्या सूत्रांनी 'लोकमत'ला शनिवारी सांगितले.
महावितरणचे मुंबईत वीज वितरण जाळे नसल्याने वीज पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा उभारणे हे प्रमुख आव्हान महावितरणपुढे असेल. बेस्ट, टाटा पॉवर व अदाणीच्या तुलनेत स्वस्त दराने वीज देऊ, असा दावा महावितरणने केला होता.