अभिनेता रितेश देशमुखचा ४५ वा वाढदिवस; जयंत पाटलांकडून खास शब्दांत शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 15:31 IST2023-12-17T15:24:49+5:302023-12-17T15:31:36+5:30

रितेश देशमुख याच्यावर ४५ व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Actor Ritesh deshmukh Birthday Best wishes in special words from Jayant Patil | अभिनेता रितेश देशमुखचा ४५ वा वाढदिवस; जयंत पाटलांकडून खास शब्दांत शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुखचा ४५ वा वाढदिवस; जयंत पाटलांकडून खास शब्दांत शुभेच्छा

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख याचा आज ४५ वा वाढदिवस आहे. मराठी सिनेमांसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या रितेशवर वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या रितेशला विविध राजकीय नेत्यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचाही समावेश आहे. रितेशच्या काही मराठी सिनेमांच्या नावांचा उल्लेख करत पाटील यांनी खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

जयंत पाटील यांनी आपल्या 'एक्स' हँडलवर एक पोस्ट लिहिली असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "आपल्या उत्कृष्ट अभिनयाने रसिक प्रेक्षकांना 'वेड' लावणारे, सिनेजगतातील मराठमोळं 'लय भारी' व्यक्तिमत्त्व, अभिनेते रितेश देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा."

पाटील-देशमुख कुटुंबाचं घट्ट नातं

अभिनेते रितेश देशमुख याचे वडील काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचं राज्याच्या राजकारणामध्ये मोठं वलय होतं. विलासराव देशमुख हे आपल्या दिलखुलास स्वभावासाठी आणि पक्षविरहीत मैत्रीसाठी ओळखले जात. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना जयंत पाटील यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात दीर्घकाळ काम केलं आहे. त्यामुळे विलासराव आणि जयंत पाटील यांचे मधूर संबंध होते. विलासरावांच्या पश्चात त्यांचे पुत्र असलेल्या रितेश देशमुख यांनीही हे संबंध जपल्याचं पाहायला मिळतं. रितेश हेदेखील जयंत पाटील यांच्या प्रत्येक वाढदिवसाला न विसरता शुभेच्छा देत असतात. अशातच आज जयंत पाटील यांनीही रितेश देशमुख यांच्या मराठीतील गाजलेल्या वेड आणि लय भारी या दोन चित्रपटांच्या नावाचा उल्लेख करत रितेशला शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Actor Ritesh deshmukh Birthday Best wishes in special words from Jayant Patil