आठवलेंनाही हवीय विधानपरिषद, रिपाइंला जागा न सोडल्याने कार्यकर्ते नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 10:32 IST2020-05-09T09:29:17+5:302020-05-09T10:32:52+5:30
भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ.

आठवलेंनाही हवीय विधानपरिषद, रिपाइंला जागा न सोडल्याने कार्यकर्ते नाराज
मुंबई - राज्यातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून ५ उमेदवारांनी घोषणा झाली असून त्यांनी आपले उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. भाजपाच्या या उमेदवांरांच्या नावावरुन भाजपातच नाराजी असल्याचे दिसून येत आहे. त्यात, आता केंद्रीयमंत्री आणि भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या रिपाइंचे प्रमुख रामदास आठवले यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आठवले यांनी भाजपाच्या कोट्यातून एका जागेची अपेक्षा होती, असे म्हटले आहे. तसेच, भाजपाने जागा नि दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाल्याचे आठवलेंनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत, तर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविरोधात बारामती मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती, प्रवीण दटके हे नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांचे वडील प्रभाकरराव दटके हे भाजपाचे नेते होते. अजित गोपछेडे हे तीन दशकांहून अधिक काळ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. या चारही नेत्यांना भाजपाकडून संधी मिळाली आहे.
महाराष्ट्रात 21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील 1 जागा भाजप ने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइं ची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजप च्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा रिपाइं ला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) May 8, 2020
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची ही निवडणूक होत आहे. मात्र, तत्पूर्वीच एकनाथ खडसेंनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. आता, मित्रपक्ष असलेल्या रिपाइंचे नेते रामदास आठवलेंनीही एका जागेची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच, आम्हाला जागा न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे आठवलेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.