नालासोपारा (मंगेश कराळे) :- दोन गॅस बाटले चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून पोलिसांनीचोरी केलेले २ गॅस सिलेंडर आणि २ चोरीच्या दुचाकी हस्तगत करत ३ गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती नालासोपारा पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी दिली आहे.
भुईगाव गिरीज डोंगरी येथील उगम भारत गॅस सर्व्हिस येथील गॅस डिलेव्हरी करणारे कामगार सतीश जाधव (४०) हे २४ डिसेंबरला दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान भाटोरी गावामध्ये गॅस डिलेव्हरी करण्यासाठी गेले होते. त्यांनी भाटोरी गावातील गास रोडवर ट्रकमधुन २७ गॅस सिलेंडर उत्तरवून घेतले होते. त्यानंतर ते गॅस रस्त्यालगत ठेवून जवळपासच्या ग्राहकांना गॅस डिलेव्हरी करत होते. आल्यानंतर त्यांना २ सिलेंडर कमी दिसले व आजूबाजूला शोध घेतल्यावरही सापडले नाही. त्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन २ सिलेंडर चोरून नेल्याची तक्रार देत गुन्हा दाखल केला.
नालासोपारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा तपास सुरु केला. घटनास्थळा वरील सीसीटीव्ही फुटेज पाहुन चोरट्यांचा शोध सुरु करुन लागलीच ठिकठिकाणी नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान गुन्ह्यातील आरोपी शहबाज खान (३२) याला चक्रेश्वर तलावाजवळ गॅस सिलेंडर व दुचाकीसह ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडे पोलीस कोठडी दरम्यान तपास केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले २ गॅस सिलेंडर तसेच त्याने नालासोपारा पूर्व परिसरात चोरी केलेल्या २ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्याच्याकडून नालासोपारा आणि तुळींज येथील ३ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहा. पो. आयुक्त विजय लगारे, नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल चळवी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय जाधव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र चंदनकर, पोउपनि योगेश मोरे, पोहवा/प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाडुलकर, प्रेम घोडेराव, पोशि बनसोडे यांनी केलेली आहे.