दुर्घटना टळली! पश्चिम रेल्वे मार्गावर एक्सप्रेस आणि ट्रकचा अपघात, जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 22:56 IST2020-07-20T22:55:42+5:302020-07-20T22:56:09+5:30
रेल्वे कायद्यांर्गत ट्रक चालक प्रकाश ठोके (५७) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दुर्घटना टळली! पश्चिम रेल्वे मार्गावर एक्सप्रेस आणि ट्रकचा अपघात, जीवितहानी नाही
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि बोरीवली दरम्यान वांद्रे-अमृतसर एक्स्प्रेस आणि एका मालवाहू ट्रकचा अपघात सोमवारी दुपारी १२.३० वाजता घडला. या घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहचून ट्रकला बाजूला काढले. या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वे इंजिन आणि ट्रकचे नुकसान झाले आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे ते अमृतसर एक्स्प्रेस सोमवारी, दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी कांदिवली आणि बोरीवली दरम्यान जात होती. मात्र रेल्वे मार्गालगत कंत्राटी एजन्सीचा रेतीने भरलेला ट्रक उभा होता. त्यामुळे ब्रांद्रा ते अमृतसर एक्स्प्रेसची धडक ट्रकला बसली. त्यामुळे ट्रकच्या मागच्या भाग दबला गेला. या धडकीत रेल्वेच्या इंजिनाचे नुकसान झाले. दुपारी १.२८ वाजता एक्सप्रेस कांदिवलीहून बोरिवली येथे नेण्यात आली. बोरिवली येथे लोको इंजिन बदलण्यात आले. दुपारी २. ३५ वाजता बोरिवलीहून एक्सप्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
पश्चिम रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटना स्थळी पोहचून चालकालासह ट्रकला ताब्यात घेतले. या घटनेच्या चौकशीचे आदेश पश्चिम रेल्वेने दिले आहे. त्यानुसार संबंधित विभागीय कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
या घटनेमध्ये कांदिवली स्थानक अधीक्षक बी.व्ही.सामंत, कांदिवली पॉइंटमन भरत सोळंकी, वाहतूक निरीक्षक एम.एस. शेख, कांदिवली स्थानक अधीक्षक विनोद दळवी यांना निलंबित केले आहे. रेल्वे कायद्यांर्गत ट्रक चालक प्रकाश ठोके (५७) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सत्यकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.