अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:11 IST2026-01-13T18:09:25+5:302026-01-13T18:11:24+5:30
Abu Salem 14-Day Parole: १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी, गँगस्टर अबू सालेम याने आपल्या भावाच्या मृत्यूचे कारण देत १४ दिवसांच्या पॅरोलसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने याला कडाडून विरोध केला आहे.

अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी आणि गँगस्टर अबू सालेम याला १४ दिवसांचा आपत्कालीन पॅरोल देण्यास महाराष्ट्र सरकारने कडाडून विरोध केला. सालेम हा एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव त्याला इतक्या दिवसांसाठी बाहेर सोडणे शक्य नसल्याचे राज्य सरकारने मंगळवारी मुंबईउच्च न्यायालयात स्पष्ट केले.
सरकारी वकील मानखुवर देशमुख म्हणाले की, सालेम हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असल्याने १४ दिवसांचा पॅरोल शक्य नाही. देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले की, "तुरुंग अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की त्याला पोलीस संरक्षणासह फक्त दोन दिवसांचा पॅरोल मिळू शकतो, ज्याचा खर्च त्याला स्वत: करावा लागेल." सालेमच्या वकील फरहाना शाह म्हणाल्या की, त्याला उत्तर प्रदेशातील आझमगडला जावे लागल्याने दोन दिवसांचा पॅरोल पुरेसा होणार नाही. तो दोन दशकांहून अधिक काळ तुरुंगात आहे आणि तो आपत्कालीन पॅरोल मागत आहे.
न्यायाधीश अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी सरकारला शपथपत्र दाखल करून सालेमला १४ दिवसांचा पॅरोल देण्याबाबतच्या चिंतांबद्दल माहिती देण्याचे निर्देश दिले. या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सालेमने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याचा मोठा भाऊ अबू हकीम अन्सारी याचे नोव्हेंबरमध्ये निधन झाल्याचे कारण देत पॅरोलसाठी याचिका दाखल केली होती. न्यायालयात ख्रिसमसच्या सुट्टीमुळे त्याची याचिका लांबली असल्याचे त्याने याचिकेत म्हटले.
याचिकेनुसार, सालेमने १५ नोव्हेंबर रोजी त्याच्या भावाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी आणि संबंधित विधी करण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांकडून १४ दिवसांचा आपत्कालीन पॅरोल मागितला होता. परंतु, तुरुंग अधिकाऱ्यांनी २० नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशाद्वारे ही याचिका फेटाळून लावली. सालेमने म्हटले होते की, तो नोव्हेंबर २००५ मध्ये अटक झाल्यापासून तुरुंगातच आहे आणि त्याची आई आणि सावत्र आईच्या मृत्युनंतर त्याला फक्त काही दिवसांसाठीच पॅरोल मिळाला होता.