Aarey Forest : आरे परिसरात कलम 144 लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 10:58 IST2019-10-05T10:56:41+5:302019-10-05T10:58:31+5:30
आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Aarey Forest : आरे परिसरात कलम 144 लागू
मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरण प्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला आहे. आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आता आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मेट्रो प्रशासनाने तातडीने वृक्षतोड करण्यास सुरुवात केल्याने पर्यावरणप्रेमींचा संताप अनावर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने गोरेगाव येथील आरे मेट्रो कारशेडविरोधात दाखल याचिका शुक्रवारी फेटाळल्या. त्यानंतर रात्री मेट्रो कारशेडसाठी येथे वृक्षतोडीला सुरुवात करण्यात आली. याची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला. वृक्षतोडीला विरोध दर्शवत येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत निषेध केली. रात्री उशिरापर्यंत वृक्षतोडीच्या विरोधासाठी पर्यावरणप्रेमींची गर्दी वाढतच गेली. अखेर पोलिसांनी यातील काही पर्यावरणप्रेमींना ताब्यात घेतले. दरम्यान, येथे दोनशेहून अधिक झाडे तोडण्यात आल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. येथील वृक्षतोडीला विरोध म्हणून गेले काही रविवार पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतरही हा विरोध कायमच असल्याचे चित्र शुक्रवारी रात्री पुन्हा पाहायला मिळाले.
Mumbai Police PRO: Prohibitory orders under Section 144 of CrPC imposed in the area near the metro-rail project site in #AareyForest. A protest was held last night at #AareyForest against the felling of trees, after the Bombay High Court order. pic.twitter.com/iXCFZUozIc
— ANI (@ANI) October 5, 2019
आरेत वृक्षतोड होत असल्याचे समजताच भांडुप, पवई, अंधेरी, गोरेगाव येथील पर्यावरणप्रेमींसह सामाजिक संस्था, विविध ग्रुप, स्थानिकांनी येथे गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दाखल झाले. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. वृक्ष तोडीस विरोध करण्यासाठी दाखल पर्यावरण प्रेमीना प्रकल्प स्थळी जाण्यास पोलीस प्रशासनाने मज्जाव केला. येथील गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला जात असतानाच पर्यावरणप्रेमी आणि पोलीसांमध्ये धक्काबुकी झाली. यावेळी पर्यावरण प्रेमींनी महापालिका, मेट्रो प्रशासन यांच्या विरोधात घोषणा दिल्या असून, अनेक झाडे तोडल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे न्याय मिळत नाही तोवर घटनास्थळाहून बाहेर पडणार नाही, असा निर्धार पर्यावरण प्रेमींनी यावेळी केला. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी आरेतील मेट्रोची कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai: Entry into #Aarey from Marol Maroshi Road restricted after Section 144 has been imposed in the area. #AareyForestpic.twitter.com/4sAaqbjLOX
— ANI (@ANI) October 5, 2019
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून कारवाईचा विरोध करत संताप व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी 'आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा घाट लज्जास्पद आहे. अधिकारी ज्या तत्परतेने आरे कॉलनीतील वृक्ष तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं. झाडांची कत्तल करण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांच्याकडे सोपवायला हवं' असं ट्विट केलं आहे.
Aarey Forest : झाडं तोडणाऱ्या अधिकाऱ्यांना दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायला पीओकेत पाठवा- आदित्य ठाकरेhttps://t.co/yVdJHC7l0C#AadityaThackeray#AareyForest
— Lokmat (@MiLOKMAT) October 5, 2019
'आरे कारशेड परिसरातील अनेक पर्यावरणवादी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी वृक्षतोडीचा हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ज्यापद्धतीने आपण मुंबई मेट्रो तीनसाठी जंगल नष्ट करत आहोत ते पाहता हा प्रकल्प भारताने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत मांडलेले सर्व दावे खोडून टाकताना दिसत आहे' असं ट्विटही आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. AareyForest हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेडींगमध्ये आहे. 'पर्यावरणसंदर्भातील समस्या, प्लास्टिकमुळे होणारे प्रदुषण यासारख्या गोष्टींवर केंद्र सरकारने बोलण्यात काहीच अर्थ नाही. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पामुळे आरेच्या वनक्षेत्राचे नुकसान होत आहे. ही लढाई अहंकाराची लढाई असल्यासारखे काम मेट्रोकडून केले जात असल्याने या मेट्रोचा मूळ उद्देशच संपला' असल्याचं आदित्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.