Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 18:55 IST

Mumbai Crime News: घरच्यांच्या दबावामुळे तरुणीने मेट्रोमोनियल साईटवर प्रोफाईल उघडले. तिथेच तिची ओळख आरोपीसोबत झाली होती. त्याने तिचा विश्वास संपादन केला. नंतर लग्न करण्याचे स्वप्न दाखवत बलात्कार केला आणि पैसेही हडपले.

नर्स म्हणून नोकरी करणाऱ्या एका तरुणीची फसवणूक करणाऱ्या आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अखेर शिक्षा झाली. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयात पीडित तरुणीला दहा वर्षांनी न्याय मिळाला. मेट्रोमोनियल साईटवर भेट झाल्यानंतर आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने बलात्कार केला. इतकंच नाही तर तरुणीच्या खात्यातील पैसेही हडपले होते. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला १० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिंडोशी सत्र न्यायालयाने दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव जयेंद्र दत्तात्रय मोरंजन असे आहे. पण, चेतक सुधीर भावसार, सचिन मिसाळ आणि राहुल आशुतोष पाटील असे नावे वापरून तो महिलांची फसवणूक करायचा. त्याने विवाहोच्छुक अनेक महिलांना जाळ्यात ओढळे आणि त्यांच्या अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

कुटुंबाच्या दबावामुळे तरुणीने मेट्रोमोनियल साईटवर प्रोफाईल बनवलं अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जयेंद्र हा बेरोजगार होता. पण, तो महिलांना कधी खासगी कंपनी नोकरी करत असल्याचे, तर बिझनेस करत असल्याचे सांगायचा. पीडित तरुणीचे २०१४ मध्ये लग्न झाले होते. पण, तिचा घटस्फोट झाला. ती नर्स म्हणून काम करायची. 

२०१६ मध्ये कुटुंबीयांनी पुन्हा लग्न करण्यासाठी तिच्या मागे तगादा लावला. कुटुंबाच्या दबावामुळे तिने मेट्रोमोनियल साईटवर प्रोफाईल तयार केले होते. त्याच दरम्यान, १८ जून २०१६ रोजी राहुल पाटील नावाच्या एका व्यक्तीने तिला मेल केला. एका खासगी कंपनी नोकरीला असल्याचे सांगितले. 

त्यानंतर पुढच्या दिवशी आरोपीने पीडित तरुणीला कॉल केला आणि लग्न करण्यासंदर्भात चर्चा करायची आहे. मला भेट असे म्हणाला. पीडितेने त्याला तिच्या घरी बोलवून घेतले. तिला तो आवडला. त्यानंतर आरोपीने तरुणीला शिर्डीला दर्शनासाठी जाण्याबद्दल विचारलं. 

शिर्डीमध्ये जबरदस्ती शरीरसंबंध

लग्नाआधी शिर्डीला जाण्याची तरुणीचीही इच्छा होती. त्यामुळे ती हो म्हणाली. शिर्डीबरोबर तरुणीच्या बहिणी नाशिकमध्ये राहतात. त्यांच्या घरी जाण्याचाही त्यांचा प्लॅन होता. शिर्डीमध्ये ते दोघे एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले होते. तिथे आरोपीने लगट सुरू केली आणि शरीरसंबंधासाठी जबरदस्ती करू लागला. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. लग्न होणार असल्याने तरुणीनेही नंतर विरोध केला नाही. 

नाशिकमध्ये तरुणीच्या बहि‍णींच्या घरी गेल्यानंतर आरोपी म्हणाला की, माझी बहीण अमेरिकेत राहते. ती २८ जुलैला मुंबईला येणार आहे. 

त्यानंतर २३ जून २०१६ रोजी दोघे पुन्हा भेटले. दोघांनी चित्रपट बघितला. मध्यांतरावेळी तरुणी वॉशरुमला गेली. त्यावेळी तिची पर्स आरोपीकडे होती. तरुणीला दुसऱ्या दिवशी एटीएम पर्समध्ये नसल्याचे कळले. त्या एटीएमवर पिन नंबरही लिहिलेला होता. तिने आरोपीला विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, पैशांची गरज असल्याने घेतले. 

नाशिकमध्ये बोलावून जबरदस्ती, तरुणी झाली गर्भवती 

२ जुलै रोजी आरोपीने तरुणीला नाशिकला बोलावले. तिथेही जबरदस्ती केली. त्यानंतर तरुणीला तिच्या बहिणीकडे सोडून निघून गेला. याच दरम्यान आरोपीने तरुणीच्या खात्यातून एक लाख ५ हजार रुपये काढले. त्याबद्दल विचारणा गेल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ केली. आणि असे बऱ्याच महिलांसोबत केल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तरुणीने १७ जुलै २०१६ रोजी विलेपार्ले येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली. त्यात ती गर्भवती असल्याचेही समोर आले. त्यानंतर तरुणीने गर्भपात केला. तपासातून समोर आले की, आरोपीने अशाच प्रकार चार महिलांची फसवणूक केली होती. 

या प्रकरणात संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर न्यायाधी एस.जे. अन्सारी यांच्या पीठाने आरोपीला १० दहा वर्षाच्या शिक्षा ठोठावली.  

टॅग्स :लैंगिक शोषणगुन्हेगारीमुंबई पोलीसलग्न