चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 19:29 IST2025-04-20T19:29:53+5:302025-04-20T19:29:53+5:30
Mumbai Crime News: मुंबईतील वरळी सीफेसजवळ एका गर्दुल्ल्याने छत्रीचा धक्का लागला म्हणून एका महिलेवर काचेच्या तुकड्याने हल्ला केला.

चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
मुंबईतील वरळी सीफेसजवळ एका गर्दुल्ल्याने महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत संबंधित महिला गंभीर झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई क्राइम युनिट ३ ने आरोपीचा शोध घेऊन अवघ्या पाच तासांत त्याला अटक केली. ही घटना १९ एप्रिल रोजी दुपारी वरळी सी फेस येथील जेके कपूर चौकाजवळ घडली.
सचिन भगवान अवसरमोल (वय, ३५), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळचा संभाजीनगरातील चिकलठाणा परिसरातील रहिवाशी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळी कोळीवाडा येथील रहिवासी अनिता पाटकर शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास रस्त्याने चालत असताना वरळी सीफेसजवळ आरोपीला त्यांच्या छत्रीचा धक्का लागला. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने अनिता यांच्यावर धारदार काचेच्या तुकड्याने हल्ला केला. या हल्ल्यात अनिता गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्यानंतर महिलेला ताबडतोब केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अनिता यांचा मुलगा संदीप बाळू पाटकर (वय,२०) याने संध्याकाळी या घटनेबाबत वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरळी पोलिस ठाण्यात आआरोपीविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम ११८(२) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे युनिट ३ ने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून वरळीतील प्रेम नगर येथून आरोपीला अटक केली आणि वरळी पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या धारदार काचेचा तुकडा जप्त केला.तक्रारीच्या पाच तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने हल्ल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.