युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 05:42 IST2025-09-11T05:39:58+5:302025-09-11T05:42:48+5:30
Uddhav Thackeray Raj Thackeray: ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ असे उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या साक्षीने ५ जुलै रोजीच्या मेळाव्यात जाहीर केले होते.

युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली
मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे फोटोमध्ये केव्हाच एका फ्रेममध्ये आलेले असताना आता राजकीयदृष्ट्या कसे एकत्र यायचे याची फ्रेम बुधवारी तब्बल अडीच तास झालेल्या चर्चेत ठरली. दसरा मेळाव्यात दोघांनी शिवाजी पार्कवर एकत्र यायचे का यावरही दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र त्या बाबत अंतिम निर्णय झाला नाही.
‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ असे उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या साक्षीने ५ जुलै रोजीच्या मेळाव्यात जाहीर केले होते. त्यानंतर २७ जुलै रोजी राज हे मातोश्रीवर उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सहकुटुंब गेले. त्यानंतर २७ ऑगस्टला उद्धव ठाकरे हे राज यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर गणरायाच्या दर्शनाला गेले आणि आज दोघांची शिवतीर्थवर दीर्घ बैठक झाली. यावेळी केवळ उद्धव सेनेचे नेते खा.संजय राऊत हे उपस्थित होते. मनसेकडून अन्य कोणीही हजर नव्हते.
उद्धव सेनेचा दसरा मेळावा २ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्याला राज ठाकरे यांनी उपस्थित राहावे की नाही या बाबत चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर शपथविधी झाला तेव्हा राज ठाकरे उपस्थित राहिले होते. यावेळी दसरा मेळाव्याला ते हजर राहिले तर उद्धव यांच्यासोबत त्यांचेही भाषण होणार का या बाबतही उत्सुकता असेल.
सूत्रांनी सांगितले की दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सातत्याने बैठका घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला. दोन पक्षांची समन्वय समिती स्थापन करण्याबाबतही विचार झाला.
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकांवर लक्ष
सूत्रांनी सांगितले की, मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे आदी महापालिकांसह अन्यत्र दोन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कसे एकत्र यायचे या बाबत आज चर्चा झाली. जागावाटप हा विषय नव्हता, मात्र, कशा पद्धतीने एकत्र येता येईल. दोघांच्या पक्षांचे हित सांभाळून युती कशी करता येईल, हा चर्चेचा मुख्य गाभा होता.
दोन बंधूंनी एकत्र येण्यासाठीचे आणखी एक मोठे पाऊल या भेटीच्या निमित्ताने उचलले गेले. विशेषत: मुंबईतील मराठी पट्ट्यामध्ये एकमेकांना सामावून घेताना येणार्या अनेक अडचणी कशा दूर करता येतील या बाबत चर्चा झाली.
आजच्या भेटीमध्ये राजकारण नव्हते. राज यांच्या आई व उद्धव यांच्या मावशी कुंदाकाकी यांनी या भेटीची इच्छा व्यक्त केली होती. म्हणून उद्धव शिवतीर्थवर गेले.
-संजय राऊत, खासदार उद्धवसेना
दोघे बंधू कौटुंबिक नात्याने एकत्र आले, ही चांगली गोष्ट आहे. ज्या राजकीय कारणामुळे त्यांच्यात वाद झाला होता, त्याच कारणासाठी ते एकत्र येत आहेत. त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही.
-चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
महाविकास आघाडीत नवा पार्टनर घेण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. तो निर्णय काँग्रेस हायकमांड घेतील.
-विजय वडेट्टीवार, विधानसभा गटनेते काँग्रेस