आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांना दिलासा कायम, मुश्रीफांच्या जामिनावर आज सुनावणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 13:41 IST2023-04-13T13:40:42+5:302023-04-13T13:41:49+5:30
वडिलांना लक्ष्य करण्यासाठी ईडी कारवाई करत असल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे

आर्थिक गैरव्यवहार प्रकरण: हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांना दिलासा कायम, मुश्रीफांच्या जामिनावर आज सुनावणी?
मुंबई : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची मुले नावीद, आबीद आणि साजिद यांना ईडीच्या अटकेपासून दिलेले संरक्षण विशेष पीएमएलए न्यायालयाने तूर्तास कायम केले आहे. न्यायालयाने २० एप्रिल रोजी तिघांच्याही अटकपूर्व जामिनावरील सुनावणी ठेवली आहे.
आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ईडी आपल्यावर कारवाई करू शकत नाही, असे तिघांनी अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे. वडिलांना लक्ष्य करण्यासाठी ईडी कारवाई करत असल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे. ईडीने जानेवारीमध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचा जबरदस्तीने जबाब नोंदवून घेतला. सत्य शोधणे हा छापेमारी किंवा तथाकथित तपासाचा उद्देश नाही.
हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरून कर्ज वाटप करण्यात आले आणि सर्व व्यवहार संशयास्पद आहेत, असे जबाब कर्मचाऱ्यांकडून नोंदवून घेणे, हेच ईडीचे उद्दिष्ट आहे, असे अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे. बुधवारी त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब झाली. न्यायालयाने त्यांना देण्यात आलेले अंतरिम संरक्षण २० एप्रिलपर्यंत कायम ठेवले.
मुश्रीफांच्या जामिनावर आज सुनावणी?
विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर गुुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना १४ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.