११ महिन्यांत १.३५ लाख मालमत्ता विक्रीचा उच्चांक, मुंबईकरांकडून राज्य सरकारला मिळाला १२ हजार २२४ कोटींचा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:54 IST2025-12-02T11:51:46+5:302025-12-02T11:54:10+5:30
चालू वर्षात झालेल्या मालमत्ता विक्रीचे वैशिष्ट्य म्हणजे घर खरेदीसाठी ग्राहकांनी प्रामुख्याने मुंबईच्या पश्चिम उपनगराला पसंती दिली असून, तेथील विक्रीचे प्रमाण हे ५६ टक्के आहे.

११ महिन्यांत १.३५ लाख मालमत्ता विक्रीचा उच्चांक, मुंबईकरांकडून राज्य सरकारला मिळाला १२ हजार २२४ कोटींचा महसूल
मुंबई : चालू वर्षीच्या पहिल्या ११ महिन्यात मुंबईत तब्बल १ लाख ३५ हजार ८०० मालमत्तांची विक्री झाली असून, हा आजवरचा उच्चांक ठरला आहे. या विक्री व्यवहारांद्वारे राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या रुपाने १२ हजार २२४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
विक्री झालेल्या या मालमत्तांमध्ये ८० टक्के प्रमाण हे निवासी मालमत्तांचे असून, उर्वरित २० टक्के मालमत्ता या कार्यालयीन तसेच व्यावसायिक स्वरुपाच्या आहेत. बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षण कंपनीच्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे.
ज्या मालमत्तांची विक्री झाली, त्यामध्ये ८४ टक्के मालमत्ता या एक हजार चौरस फूट आकारमानापर्यतच्या आहेत. एक हजार ते दोन हजार चौरस फूट मालमत्तांचे विक्रीतील प्रमाण हे १३ टक्के असून, २ हजार चौरस फूट आणि त्यावरील आकारमानाच्या मालमत्तांच्या विक्रीचे प्रमाण ३ टक्के आहे.
नोव्हेंबर महिन्यात १२ हजार मालमत्तांची विक्री
नुकत्याच सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईत १२ हजार २१९ मालमत्तांची विक्री झाली असून, याद्वारे राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या रुपाने १,०३८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
चालू वर्षात झालेल्या मालमत्ता विक्रीचे वैशिष्ट्य म्हणजे घर खरेदीसाठी ग्राहकांनी प्रामुख्याने मुंबईच्या पश्चिम उपनगराला पसंती दिली असून, तेथील विक्रीचे प्रमाण हे ५६ टक्के आहे.
पूर्व उपगनरात घर घेणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण हे २९ टक्के इतके आहे. त्या तुलनेत दक्षिण मुंबईत घर घेण्याचे प्रमाण नऊ टक्क्यांवर स्थिर आहे. मध्य मुंबईत केवळ ६ टक्के ग्राहकांनी घर घेतले आहे. एकूणच पाहता वर्षभरात शहर, उपनगरात घरांच्या विक्रीचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात दिसून आले.