"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:34 IST2025-09-17T15:31:11+5:302025-09-17T15:34:36+5:30
दादरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये आक्रोश आहे. सकाळपासून या भागात कार्यकर्त्यांची गर्दी आहे

"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
मुंबई - दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. अज्ञातांनी या पुतळ्यावर लाल रंग फेकला, सकाळी ही गोष्ट शिवसैनिकांच्या निदर्शनास येताच इथं गर्दी जमली. पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. याठिकाणी राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरे यांनीही पुतळ्याची पाहणी केली आहे. त्यावेळी महाराष्ट्र पेटवण्याचा कुणाचा तरी डाव दिसतोय अशी शंका त्यांनी उपस्थित केला.
याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, हा प्रकार निंदनीय आहे. ज्याला स्वत:च्या आई वडिलांची लाज वाटते अशा नराधमाने, बेवारस व्यक्तीने ही गोष्ट केली असावी किंवा बिहारमध्ये ज्या प्रकारे मोदींच्या आईचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न झाला तसा महाराष्ट्र पेटवण्याचे काम कुणी करत असेल. आमच्या भावना तीव्र आहेत. आम्ही शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केले आहे. पोलीस या घटनेतील आरोपीचा शोध घेत आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच या घटनेमागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. महाराष्ट्रात दंगल पेटवण्याचा काहींचा प्रयत्न असावा अशा लोकांनी हे केले असावे अशी शंका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. दादरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर शिवसैनिकांमध्ये आक्रोश आहे. सकाळपासून या भागात कार्यकर्त्यांची गर्दी आहे. ज्यावेळी हा प्रकार निदर्शनास आला तेव्हा शिवसैनिकांनी पाण्याने मीनाताई ठाकरे यांचा पुतळा स्वच्छ धुतला. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, खासदार यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. तातडीने जो कुणी आरोपी आहे त्याला पकडा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.
२४ तासांत आरोपीला शोधा - राज ठाकरे
दरम्यान, सकाळी या प्रकाराची माहिती मिळताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी भेट दिली. तिथे संबंधित पोलीस अधिकारी यांच्याशी राज यांनी संवाद साधला. त्यावेळी परिसरातील सगळे सीसीटीव्ही चेक करा, २४ तासांत या आरोपीला शोधून काढा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.