तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:29 IST2026-01-01T18:27:46+5:302026-01-01T18:29:57+5:30
Tejasvee Ghosalkar News: ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षांतर केले. त्यानंतर उद्धवसेनेने एका महिलेलाच त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.

तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी
Tejasvee Ghosalkar Uddhav Thackeray Shiv Sena: मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरूच आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर यांना भाजपाने पक्षात घेतले. दहीसर वार्ड क्रमांक २ मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली असून, उद्धव ठाकरे यांनी आता या मतदारसंघातून धनश्री कोलगे यांना उमेदवारी दिली आहे.
माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्याविरोधात उद्धवसेनेने त्यांच्या मैत्रिणीला उमेदवारी दिली आहे. धनश्री कोलगे आणि तेजस्वी घोसाळकर या जुन्या मैत्रिणी आहेत. दहिसर विधानसभा मतदारसंघातील वार्ड क्रमांक २ मध्ये यानिमित्ताने दोन मैत्रिणींमधील लढत बघायला मिळणार आहे.
उद्धवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर धनश्री कोलगे म्हणाल्या की, टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावरील काम करणारा चेहरा, बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार अशीच ही लढत होणार आहे.
धनश्री कोलगे कोण आहेत?
उद्धवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या धनश्री कोलगे या युवा सेना कार्यकारिणी सदस्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून वार्डमध्ये त्या काम करत आहेत. त्यामुळे वार्डामधील कामाची दखल घेऊनच उद्धवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

धनश्री कोलगे यांनी प्रचाराला सुरूवात केली असून, तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हेही प्रचार करत आहेत. सून भाजपाची उमेदवार, तर सासरा उद्धवसेनेचा प्रचार असे चित्र या वार्डामध्ये बघायला मिळत आहे.