Join us
Daily Top 2Weekly Top 5

झवेरी बाजारातल्या खाऊ गल्लीत बॉम्ब ठेवलाय, सोलापूरचा तरुण मुंबईत अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 06:33 IST

घरच्यांशी झालेल्या भांडणाचा पाेलिसांच्या डाेक्याला ताप; सोलापूरच्या तरुणाला अटक

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : साहेब, झवेरी बाजारातील खाऊ गल्ली परिसरात बॉम्ब ठेवण्यात आला असून, मोठा घातपात होणार आहे. मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होणार आहे, असा कॉल सोमवारी पोलीस नियंत्रण कक्षात थडकला आणि क्षणार्धात पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी तत्काळ संबंधित परिसर रिकामा केला. सर्व परिसराची कसून तपासणी केली. मात्र, तपासणीत काहीच आढळले नाही. अखेरीस कोणीतरी जाणूनबुजून खोटा कॉल केल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक तपासाच्या आधारे एकाला पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्याचे नाव दिनेश सुतार (२४) असे असून घरच्यांशी भांडण झाल्याचा राग मनात ठेवून त्याने हा खोटा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. 

झवेरी बाजारात बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन सोमवारी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. या कॉलने मुंबई पोलिसांसह सर्वच तपास यंत्रणा सतर्क झाल्या. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी खाऊ गल्ली परिसर पूर्ण रिकामा केला. बॉम्बशोधक पथकाने परिसराची कसून तपासणी केली. मात्र, कुठेच काही आढळले नाही. बॉम्बबाबत माहिती देणाऱ्याकडून काही मिळते का, म्हणून पोलिसांच्या एका पथकाने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने फोन कट केल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याच्या मोबाइल लोकेशनवरून भुलेश्वर येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आपले नाव दिनेश सुतार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. झवेरी बाजारात कोणताही बॉम्ब ठेवला नसल्याचे दिनेशने स्पष्ट केले. अखेरीस त्याला अटक करण्यात आली. पोलीस सुतारची कसून चौकशी करत आहेत.

 बेराेजगार तरुण अन्... मूळचा सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील चोपडी गावचा सुतार बेरोजगार आहे. गावी घरच्यांशी भांडण झाल्याने तो सांगलीवरून ८ ते १० दिवसांपूर्वी मुंबईत आला.  पूर्वी काम करणाऱ्या काळबादेवी येथील शकुंतला बिल्डिंगजवळील एका दुकानाबाहेर राहत असल्याचे दिनेशने सांगितले. 

 त्या महिलेचा राग फेसबुकद्वारे ओळख झालेल्या अहमदनगर येथील महिलेने त्रास दिल्याने दिनेशने झवेरी बाजारच्या काॅलपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षासह जामखेड पोलिसांनाही कॉल करून जामखेड परिसरात बॉम्ब ठेवला असल्याची अफवा पसरविली होती, असे चौकशीत आढळून आले.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीसोलापूरपोलिस