वादाची पार्श्वभूमी, तरी मतदान शांततेत; मुंबई उत्तर पूर्वमध्ये काही ठिकाणी तांत्रिक अडचणी
By जयंत होवाळ | Updated: May 21, 2024 14:19 IST2024-05-21T14:19:12+5:302024-05-21T14:19:30+5:30
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन यांतील काही तांत्रिक अडचणी वगळता या ठिकाणी शांततेत मतदान झाले.

वादाची पार्श्वभूमी, तरी मतदान शांततेत; मुंबई उत्तर पूर्वमध्ये काही ठिकाणी तांत्रिक अडचणी
मुंबई : दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केल्यामुळे मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन यांतील काही तांत्रिक अडचणी वगळता या ठिकाणी शांततेत मतदान झाले.
मराठी-गुजराती वाद, मिहीर कोटेचा यांच्या रॅलीवर झालेली कथित दगडफेक, मतदानाच्या ४८ तास आधी कोटेचा यांच्या वॉर रूममधून पैशांचे वाटप होत असल्याच्या आरोपावरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घातलेला गोंधळ या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर पूर्वेतील मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मतदानाच्या दिवशी ठाकरे आणि शिंदे गटात राडे होतील, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र, तसे काहीही न होता येथील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
भांडुपमध्ये एका शाळेत बंद पडलेला वीज पुरवठा आणि काही ठिकाणी व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडल्याच्या तक्रारींमुळे मतदानाच्या वेगावर परिणाम झाला होता. भांडुप पश्चिमेकडील रामकली विद्या मंदिर मतदान केंद्राच्या १५७ ते १६६ क्रमांकाच्या बूथमध्ये मतदान संथपणे होत असल्याच्या तक्रारी होत्या. घाटकोपर पार्कसाईट येथेही अशीच तक्रार होती. भांडुपच्या खिंडीपाडा ओमेगा शाळेच्या मतदान केंद्रावर दुपारी सव्वा एकच्या सुमारास वीज खंडित झाली होती. त्यामुळे मतदानावर परिणाम झाला होता. मानखुर्द आणि मुलुंडच्या १२६ क्रमांकाच्या केंद्रावर व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाला होता. मात्र, हे बिघाड काही वेळातच दूर करण्यात आल्याचे निवडणूक अधिकऱ्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीची तक्रार
उत्तर पूर्व मध्ये ज्या ठिकाणी आमचे मतदार जास्त होते तिथे मुद्दाम मतदानाचा वेग कमी ठेवला होता. काही ठिकाणी केंद्रावरील कर्मचारी टंगळमंगळ करीत होते. मशीन बंद पडत होत्या. आमच्या मतदारांना मतदान करता येऊ नये, असेच प्रयत्न दिसत होते, असा आरोप संजय पाटील यांच्या प्रवक्त्याने केला.
सहाच्या आत जा
संध्याकाळी सहा वाजण्याच्या आत मतदान केंद्रात जा. त्यानंतर अगदी रात्रीचे बारा वाजले तरी तुम्हाला मतदान करता येईल, असे आवाहन संजय पाटील यांच्या ग्रुपवर करण्यात आले होते.
यांनी येथे केले मतदान
महाविकास आघाडीचे संजय पाटील यांनी भांडुप पश्चिमेकडील त्यांच्या कार्यालयाशेजारील आयडीयुबीएस शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला, तर महायुतीचे मिहीर कोटेचा यांनी मुलुंड पश्चिमेकडील स्वप्न नगरी येथील एनईएस शाळेत मतदान केले.