मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ९१% साठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:41 IST2019-08-04T02:30:52+5:302019-08-04T06:41:21+5:30
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा जलसाठा एक लाख १६ हजार ३५१ दशलक्ष लिटरने अधिक आहे.

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ९१% साठा
मुंबई : तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस सतत बरसात असल्याने आता ९१.५३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा जलसाठा एक लाख १६ हजार ३५१ दशलक्ष लिटरने अधिक आहे.
वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये एकूण १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये ९१ टक्के जलसाठा असल्याने मुंबईत दहा टक्के पाणीकपात केली. जुलैच्या पंधरवड्यात परतलेल्या पावसाने जवळपास सर्व तलाव भरले आहेत. अप्पर वैतरणा तलाव लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे तलावांमध्ये १३ लाख २४ हजार दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. मागील दोन वर्षांमध्ये याच दरम्यान ८३ ते ८६ टक्के जलसाठा होता. तर यावर्षी एक लाख १६ हजार ३५१ जलसाठा अधिक आहे. तलाव शंभर टक्के भरण्यासाठी आणखी नऊ टक्के जलसाठा जमा होण्याची आवश्यकता आहे.