८१५ एसटी प्रवाशांचा २२ महिन्यांमध्ये मृत्यू; अनेकदा अपघाताला चालकच जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:05 IST2026-03-24T14:05:21+5:302026-03-24T14:05:21+5:30
महामंडळाकडून नुकसानभरपाई देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

८१५ एसटी प्रवाशांचा २२ महिन्यांमध्ये मृत्यू; अनेकदा अपघाताला चालकच जबाबदार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसने एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२६ या २२ महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात ६ हजार ८२० अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले, तर काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यांना महामंडळाकडून नुकसानभरपाई देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महामंडळाने दिलेल्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये ७ हजार ४४३ जण जखमी झाले, तर ८१५ जणांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त आणि त्यांच्या नातेवाइकांना नियमांनुसार नुकसानभरपाई देण्यात येते. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या ज्येष्ठ मुलगा किंवा अविवाहित ज्येष्ठ मुलगी यांना नुकसानभरपाई देण्याचे धोरण स्वीकारणारे एसटी महामंडळ हे भारतातील पहिलेच महामंडळ असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला. अपघाती नुकसानभरपाई संदर्भातील प्रकरणे न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत, यासाठी लोकन्यायालयाच्या माध्यमातून तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याची पद्धत १९८५ सालापासून सुरू केली आहे.
अनेकदा अपघाताला चालकच जबाबदार
अपघातांत चालक अंशतः किंवा पूर्णतः जबाबदार असल्याचे दिसते. अशा प्रकरणांत नुकसानभरपाईच्या मागण्या निकाली काढण्यासाठी महामंडळाकडून प्रतिसाद मिळतो.
एसटी बसने प्रवास करणाऱ्यांचा १ रुपयात विमा
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत एसटी महामंडळाकडून तिकिटाच्या दरामधील १ रुपया विम्यासाठी राखून ठेवला जातो. या रकमेच्या माध्यमातून एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा विमा उतरविला जातो.
प्रवासादरम्यान अपघात घडल्यास जखमी किंवा मृत्यू झालेल्या 3 प्रवाशांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने ही विमा योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याचा प्रयत्न महामंडळाकडून केला जात आहे.