निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 06:54 IST2025-10-29T06:54:03+5:302025-10-29T06:54:03+5:30
मतदार यादीवर मनसे, उद्धवसेनेची नजर

निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
महेश पवार
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पक्षात नवे व जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून उद्धवसेनेचे किमान ७० टक्के नवे चेहरे उमेदवार असतील. त्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते रणनीती आखत आहेत.
उद्धव आणि राज यांनी अद्याप युतीची घोषणा केली नसली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका झाल्या आहेत. यामध्ये प्रत्येक वॉर्डातील दोन्ही पक्षांची ताकद व प्रभाव याचा विचार करून जागावाटपाचा विचार केला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या स्थानिक कार्यकर्त्यांना संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, मराठी बहुल भाग वगळता उर्वरित वॉर्डात उद्धवसेनेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ८४ जागा जिंकल्या होत्या. मात्र, त्यातील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्या जागी नवीन चेहरे मैदानात उतरविण्यात येणार आहेत. तर, तक्रारप्राप्त तसेच ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या माजी नगरसेवकांना यावेळी उमेदवारीची संधी दिली जाणार नाही. परंतु, त्यांच्या वाॅर्डातील उमेदवार निश्चित करताना त्यांचे अनुभव, पक्षातील योगदान लक्षात घेऊन त्यांचेही मत विचारात घेतले जाणार आहे. यामुळे नव्या पिढीला संधी मिळून पक्षात तरुण नेतृत्वाचा सहभाग वाढेल, असे सूत्रांनी सांगितले.
मतदार यादीवर मनसे, उद्धवसेनेची नजर
मतदार यादीतील गडबड वा फेरफार रोखण्यासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे वॉर्डनिहाय तपासणी करणार आहेत. उद्धवसेनेच्या शाखा प्रमुखांनी मनसेच्या शाखा अध्यक्षांसोबत समन्व्यय ठेवून घरोघरी जाऊन मतदारांची तपासणी करावी. यानिमित्त दोन्ही पक्षांच्या पारंपरिक मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यावर भर देण्याच्या सूचना लवकरच देण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.