६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:22 IST2025-11-12T13:20:57+5:302025-11-12T13:22:28+5:30
Konkan Railway News: संपूर्ण कोकण रेल्वेवर तिकीट तपासणी मोहिमा भविष्यातही सुरू राहणार आहेत.

६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
Konkan Railway News: गेल्या काही महिन्यांपासून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर वचक ठेवण्यासाठी मध्य, पश्चिम रेल्वेने मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या. हजारो प्रवाशांवर कारवाई करत, कोट्यवधींचा दंड वसूल केला. कोकणरेल्वेनेही गेल्या अनेक महिन्यात मोठ्या प्रमाणावर विशेष तपासणी मोहिमा राबवत लाखो प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेवरील विनातिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी, विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान सव्वा दोन लाखांहून अधिक प्रवाशांकडून जवळपास १५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
एकूण १५.२१ कोटी रुपयांचा दंड वसूल
ऑक्टोबर महिन्यात ९२० तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. यात ४२ हजार ६४५ दोषी प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून २.४० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान ६ हजार ४१३ तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. यामध्ये तिकीट तपासणीत दोषी आढळलेल्या एकूण दोन लाख २५ हजार ४२६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. दोषी प्रवाशांकडून एकूण १५.२१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दरम्यान, योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे. संपूर्ण कोकण रेल्वेवर तिकीट तपासणी मोहिमा भविष्यातही सुरू राहणार आहेत. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.