वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 05:45 IST2025-07-08T05:44:33+5:302025-07-08T05:45:07+5:30

मेट्रो १ मार्गिकेवर सद्यस्थितीत ५ लाखांहून अधिक प्रवाशांकडून प्रवास केला जात आहे. गर्दीच्या वेळी या मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागतात.

6-coach train soon on Versova-Ghatkopar Metro?; Permission sought for purchase of additional coaches | वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी

वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी

मुंबई : वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेवर लवकरच सहा डब्यांची मेट्रो गाडी धावण्याची चिन्हे आहेत. मेट्रो १ मार्गिकेचे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रा. लि. या कंपनीने मेट्रो गाडीकरिता अतिरिक्त डबे खरेदी करण्यासाठी इंडिया डेब्ट रिझोल्यूशन कंपनीमार्फत नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे (एनएआरसीएल) प्रस्ताव सादर केला आहे. मागील महिनाभरापासून याबाबत चर्चा सुरू होती, अशी माहिती एमएमओपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मेट्रो १ मार्गिकेवर सद्यस्थितीत ५ लाखांहून अधिक प्रवाशांकडून प्रवास केला जात आहे. गर्दीच्या वेळी या मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागतात. सध्या या मेट्रो मार्गिकेवर चार डब्यांची मेट्रो चालवली जाते. परिणामी, अधिक प्रवाशांची वाहतूक करता यावी, यासाठी या मेट्रो मार्गिकेवर सहा डब्यांची मेट्रो चालविण्याची मागणी केली जात होती.

अखेर एमएमओपीएलने आता एनएआरसीएलकडे प्रस्ताव सादर करून या मेट्रो मार्गिकेवर सहा डब्यांची गाडी सुरू करण्यासाठी अतिरिक्त कोच खरेदीची परवानगी मागितली आहे. एमएमओपीएलला ही परवानगी मिळाल्यास या मेट्रो मार्गिकेसाठी अतिरिक्त डबे खरेदीचा मार्ग मोकळा होणार आहे. मेट्रो १ मार्गिकेची खासगी - सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर उभारणी करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी २ हजार ३५६ कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्यात रिलायन्स इन्फ्राची ७४ टक्के, तर एमएमआरडीएची २६ टक्के भागीदारी आहे. मेट्रो १ मार्गिकेवर सहा बँकांचे सुमारे १,७११ कोटी रुपयांचे कर्ज आहे. 

प्रवाशांचा गर्दीचा प्रवास टळणार
मेट्रो १ मार्गिकेवर चार डब्यांच्या गाडीतून साधारणपणे एकावेळी १७५० प्रवाशांची वाहतूक होते. या मार्गिकेवर सहा डब्यांची गाडी धावू लागल्यास प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २२५० पर्यंत वाढू शकेल. तर प्रत्येक फेरीला २७०० प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होईल. त्यातून कार्यालयीन वेळेत अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता निर्माण झाल्याने मेट्रो १ मार्गिकेच्या स्थानकांवरील गर्दी टळेल. तसेच प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल. 

...तर कोच खरेदी अशक्य
या मेट्रोचे संचलन करणाऱ्या एमएमओपीएल कंपनीने हे कर्ज फेडण्यास असमर्थता दर्शविल्याने बँकांनी दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी एनसीएलटीमध्ये धाव घेतली होती.  तसेच यावर्षी या बँकांनी हे कर्ज एनएआरसीएल या सरकारी कंपनीला विकले होते. त्यामुळे आता एनएआरसीएलकडून या कर्जाची वसुली केली जाणार आहे. त्यामुळे बँकेच्या परवानगीशिवाय अतिरिक्त कोच खरेदी करणे एमएमओपीएलला शक्य नाही.

Web Title: 6-coach train soon on Versova-Ghatkopar Metro?; Permission sought for purchase of additional coaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.