गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५९७ गाड्या फुल्ल; चाकरमान्यांसाठी आता ५००० जादा बसची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 07:43 IST2025-07-17T07:43:33+5:302025-07-17T07:43:53+5:30

२७ तारखेपर्यंतच्या नियमित ५९७ बस दोन महिन्यांआधीच फुल्ल झाल्या...

597 ST buses full for Ganeshotsav; Now 5000 additional buses available for Chakarmanya | गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५९७ गाड्या फुल्ल; चाकरमान्यांसाठी आता ५००० जादा बसची सोय

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५९७ गाड्या फुल्ल; चाकरमान्यांसाठी आता ५००० जादा बसची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने मुंबई, ठाणे व पालघरमधील चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २७ तारखेपर्यंतच्या नियमित ५९७ बस दोन महिन्यांआधीच फुल्ल झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबई सेंट्रल आणि परळ डेपोमधून रोज १२ बस कोकण मार्गावर धावतात. तसेच ठाणे आणि पालघरमधूनदेखील नियमित बस असतात. 
या बसचे बुकिंग २३ जून ते २७ जून या कालावधीमध्ये फुल्ल झाल्याने अतिरिक्त ५००० बसची तरतूद करण्यात आली आहे. त्यांचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात २२ जुलैपासून जादा बसेसमधील गट आरक्षणाला सुरुवात होणार असून, त्यात इतर व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सवलतीही मिळणार आहेत.

सुरळीत वाहतुकीसाठी खबरदारी घेणार
गणेशोत्सवादरम्यान वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकेदेखील तैनात करण्यात येणार आहेत.

गणपती बाप्पा, चाकरमानी व एसटी यांचे अतूट नाते आहे. चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या-तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. त्यानुसार यावर्षीसुद्धा अतिरिक्त बसची सोय करण्यात आली आहे.
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

Web Title: 597 ST buses full for Ganeshotsav; Now 5000 additional buses available for Chakarmanya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.