मुंबईत टप्प्याटप्प्यात ५ ते १० टक्के पाणी कपात!
By जयंत होवाळ | Updated: May 25, 2024 19:54 IST2024-05-25T19:54:19+5:302024-05-25T19:54:45+5:30
समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.

मुंबईत टप्प्याटप्प्यात ५ ते १० टक्के पाणी कपात!
मुंबई : मुंबईत तूर्तास पाणी कपातीचा विचार नाही,असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी करून काही तास उलटले असताना मुंबई महापालिका प्रशासनाने पाणी कपात जाहीर केली आहे. मुंबईत टप्प्याटप्प्याने पाच आणि १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून ३० मे पासून ५ टक्के पाणीकपात, तर बुधवार ५ जून पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही आहे.
२०२१ आणि २०२२ या दोन वर्षात १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय होता. मात्र २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. २५ मे २०२४ रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या फक्त ९.६९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लीटर, तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे.
याचा अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, यंदा मॉन्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे, असे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.परंतु अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्व पैलूंचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ५ टक्के आणि १० टक्के कपात लागू राहणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.