प.रेल्वेच्या लोकलमध्ये ५ लाख ७६ हजार फुकटे; सहा महिन्यांत लोकलमध्ये २७ कोटींचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:04 IST2025-10-09T11:03:44+5:302025-10-09T11:04:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पश्चिम रेल्वेत एप्रिल ते सप्टेंबर अशा चार महिन्यांत ५ लाख ७६ हजार फुकटे प्रवासी ...

प.रेल्वेच्या लोकलमध्ये ५ लाख ७६ हजार फुकटे; सहा महिन्यांत लोकलमध्ये २७ कोटींचा दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम रेल्वेत एप्रिल ते सप्टेंबर अशा चार महिन्यांत ५ लाख ७६ हजार फुकटे प्रवासी आढळले असून त्यांच्याकडून २७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. संपूर्ण पश्चिम रेल्वेवर याच कालावधीत विनातिकीट किंवा चुकीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या ९७ कोटी प्रवाशांकडून दंड वसूल केला आहे.
पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, सप्टेंबर २०२५ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अंमलबजावणीच्या कार्यात उल्लेखनीय वाढ झाली. त्यानुसार संपूर्ण पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकीट आढळलेल्या किंवा अनियमित प्रवासाच्या २.३५ लाख प्रकरणांमध्ये १३.२८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यात बुक न केलेल्या सामानाच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.
सप्टेंबर २०२४ च्या तुलनेत ही संख्या ११६ टक्के वाढ आहे. मुंबई उपनगरीय विभागात सुमारे ९६ हजार प्रकरणांमधून ४.०२ कोटी रुपये वसूल करण्यात आले.
एसी लोकलमधून केली
९३.४० लाखांची वसुली
वातानुकूलित (एसी) लोकलमध्ये राबवलेल्या तपासणी मोहिमेत एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत ४९ हजारांहून अधिक अनधिकृत प्रवासी आढळून आले.
त्यांच्याकडून १ कोटी ५९ लाख रुपये दंड वसूल केला. हा दंड गेल्या वर्षीच्या कालावधीपेक्षा ७० टक्के जास्त असल्याचे निष्पन्न झाले.
महिना दंड (रुपयांत ) फुकटे प्रवासी
एप्रिल ६ कोटी १,०६,०८४
मे ५.७१ कोटी १,०४,२२२
जून ४.१९ कोटी ९०,२१५
जुलै ३.६५ कोटी ९१,८६६
ऑगस्ट ३.४४ कोटी ८७,९०७
सप्टेंबर ४.०२ कोटी ९६,२९०
एकूण २७.०१ कोटी ५, ७६,५८४