मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 11:46 IST2025-09-01T11:44:57+5:302025-09-01T11:46:49+5:30

Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation in Mumbai: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत आले. CSMT स्टेशन, मंत्रालय या भागात मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. याचा फटका चाकरमानी मुंबईकरांना बसत असल्याचे म्हटले जात आहे.

4th day of manoj jarange patil protest for maratha reservation in mumbai csmt area blocked many roads closed diverted traffic jam mumbaikars suffer | मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त

मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त

Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation in Mumbai: मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू असताना त्यांच्या मागण्यांवर सरकार पातळीवर बैठकांचा जोर दिसून आला. मात्र, सरकारच्या वतीने जरांगे यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. 'बैठकांना जोर, चर्चेला मात्र ब्रेक' असे चित्र होते. दुसरीकडे आंदोलनाची धार तीव्र करण्याचा इशारा देत आपण सोमवारपासून पाणीही पिणार नाही, असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईच्या सीएसएमटी स्थानक परिसर जवळपास ठप्प झाला आहे. अनेक रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे. यामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर हजारो चाकरमानी मुंबईत आपापल्या कामावर परतत आहेत. यातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर जात असणाऱ्या नोकरदारांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. सीएसएमटी स्थानक परिसरासह अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

सीएसएमटी जंक्शन व आसपासच्या भागाकडे जाणे टाळावे

सीएसएमटी जंक्शन व आसपासच्या भागाकडे जाणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. याशिवाय जे.जे. मार्गावरील वाहतूक एमआरए मार्ग पोलिस ठाण्यापासून पोलिस आयुक्त कार्यालयाद्वारे मेट्रो सिनेमा जंक्शनकडे वळवण्यात आली आहे. तसचे पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक परिस्थितीनुसार जे.जे. मार्गाकडे वळवली जाऊ शकते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्याबाबत पोलिसांकडून योग्यत्या सूचना देण्यता येणार आहेत. डी.एन. रोड (उत्तर दिशेची वाहतूक) फॅशन स्ट्रीटमार्गे मेट्रो सिनेमाकडे वळवण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा येथून अतिरिक्त पोलीस या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. 

मंत्रालय परिसरातील काही रस्ते बंद

मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारसोबतची चर्चा अद्याप निष्फळ ठरत असल्याने आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालय परिसरातील काही रस्ते पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्याचबरोबर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. सीएसएमटी आणि आझाद मैदान परिसरात आंदोलकांची गर्दी वाढल्याने वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अनेक भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून सामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मराठा आंदोलक मंत्रालय परिसर, शेअर बाजार इमारतीचा परिसर यांसारख्या अनेक ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, सोमवारी चाकरमान्यांची मोठ्या संख्येने कामावर जाण्याची वेळ आणि आंदोलन यामुळे कोंडीत भर पडली. प्रवाशांना वेळेत ऑफिसला पोहोचणे कठीण झाले. वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार आंदोलकांमध्ये तोडगा न निघाल्यामुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा फटका मुंबईकरांना बसत असून, सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते, असे म्हटले जात आहे. 

 

Web Title: 4th day of manoj jarange patil protest for maratha reservation in mumbai csmt area blocked many roads closed diverted traffic jam mumbaikars suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.