३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 08:19 IST2024-05-22T08:18:16+5:302024-05-22T08:19:10+5:30
उन्हाळा संपत असताना ते पुन्हा गुजरातच्या दिशेने जातात. कालही ते असेच निघाले. मात्र दुबईहून मुंबईत येणाऱ्या विमानाला त्यांचा एक थवा धडकला आणि ३९ फ्लेमिंगोंचा श्वास कायमचा थांबला...

३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
"आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा..." असे म्हणत आपल्या देशाकडे निघालेल्या ३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास नवी मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला. गुजरात कच्छच्या रणातून हिवाळ्यात हे फ्लेमिंगो मुंबई महानगर प्रदेश आणि ठाणे खाडी परिसरात येतात. खाद्य आणि प्रजननासाठी योग्य जागेच्या शोधात ते वर्षानुवर्ष इथे येत आहेत. नवी मुंबई, सीवूड, पामबीच, शिवडी, भांडुप, उरण इथल्या खाडीत ते प्रेम करतात. उन्हाळा संपत असताना ते पुन्हा गुजरातच्या दिशेने जातात. कालही ते असेच निघाले. मात्र दुबईहून मुंबईत येणाऱ्या विमानाला त्यांचा एक थवा धडकला आणि ३९ फ्लेमिंगोंचा श्वास कायमचा थांबला...
जिथे आपले प्रेम फुलले त्याची आठवण काढत हे फ्लेमिंगो दरवर्षी आगळ्यावेगळ्या ओढीने नवी मुंबईच्या दिशेने झेपावतात. त्यांच्या डौलदार भावमुद्रा टिपणाऱ्या छायाचित्रकारांसाठी त्यांचे येणे म्हणजे जणू दिवाळीच... त्यांना पाहायला येणाऱ्या मुलांसाठी यासारखा आनंद सोहळा दुसरा नसतो... नवी मुंबईची आगळीवेगळी ओळख याच फ्लेमिंगोनी तयार केली. त्यांना इथला परिसर एवढा आवडू लागला की ते हल्ली बऱ्याचदा इथेच दिसू लागले. मात्र त्यांच्या या नैसर्गिक अधिवासावरच नवी मुंबई येथे होणाऱ्या विमानतळाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. निसर्गाचा ऱ्हास करून होणारा विकास विनाश असतो, असे म्हटले जाते. आकाशी झेप घेणाऱ्या या सुंदर जीवांचा आकाशातच उडणाऱ्या यांत्रिक पक्षांच्या धडकेने जीव गेला... कोण कोणाच्या जागेवर अतिक्रमण करत आहे कोणास ठाऊक..? मुक्या फ्लेमिंगोंची फिर्याद तरी कोणत्या कोर्टात चालणार..? ज्या विमानाच्या धडकेने हे निष्पाप पक्षी गेले त्या विमानात ३१० प्रवासी होते. सुदैवाने त्यांना काहीही झाले नाही.
पण वैमानिकाला हे पक्षी दिसले नाहीत का? दिसले तर त्यांनी काय केले? अशा चौकशीची उड्डाणे आता होत राहतील. जे उरले ते फ्लेमिंगो आपल्या देशी आपल्या मित्रांच्या आठवणी मागे सोडून परत गेले... पुन्हा नव्या जिद्दीने परत येण्यासाठी... (छाया : प्रतीक चोरगे)