Join us

मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय; आचारसंहितेपूर्वी विविध घटकांना खुश करण्यासाठी निर्णयांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 05:34 IST

विशेष म्हणजे, या आठवड्यात आणखी एक मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यातही असाच निर्णयांचा पाऊस पाडला जाण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आयोजित राज्य मंत्रिमंडळाच्या एकाच बैठकीत तब्बल ३३ निर्णय घेण्यात आले असून यातून विविध घटकांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या आठवड्यात आणखी एक मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यातही असाच निर्णयांचा पाऊस पाडला जाण्याची शक्यता आहे.

६१ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ 

आदिवासी विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्यातील ६१ आदिवासी अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच, ४४ अनुदानित माध्यमिक आश्रमशाळांना संलग्न कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासही मान्यता देण्यात आली. 

आदिवासींसाठी दोन योजना

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दोन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या योजनेत स्वयंरोजगारासाठी प्रवासी वाहन, मिनी ट्रक, ट्रक व ट्रॅक्टर, मालवाहू इलेक्ट्रिक रिक्षा त्याचप्रमाणे कृषी संलग्न व्यवसाय, ऑटोमोबाइल, हॉटेल, ढाबा सुरू करण्यासाठी ५ लाखांपर्यत कर्ज दिले जाईल. दुसऱ्या योजनेत पुढील ३ वर्षांत ६० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येऊन त्यामधून १८ हजार आदिवासी लाभार्थींना लाभ देण्यात येईल.

खासगी शाळांतील कर्मचाऱ्यांना प्रगती योजना लागू

खासगी मान्यताप्राप्त शाळांतील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे. याच धर्तीवर १ जानेवारी २०२४ पासून योजना लागू करण्यात येईल.

यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू

यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. २७ एचपीपेक्षा जास्त पण २०१ एचीपीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रति युनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्यात येईल. 

जीएसटीमध्ये ५२२ पदांना मंजुरी

वस्तू व सेवा कर विभागात नवीन ५२२ पदांना मान्यता दिली. ९ पदे अपर राज्य कर आयुक्त, ३० राज्य कर सह आयुक्त, २६ राज्य कर उपायुक्त, १४३ सहायक राज्य कर आयुक्त, २७५ राज्य कर अधिकारी, २७ राज्य कर निरीक्षक आणि २ स्वीय सहायक लघुलेखक गट-अ अशा पदांचा समावेश आहे. 

अयोध्येत भूखंड

अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली. हा भूखंड ९४२० चौ. मीटर एवढा असून याची किंमत ६७ कोटी १४ लाख इतकी आहे. हा भूखंड शहानवाजपूर माझा येथे आहे. बांधकाम झाल्यावर भाविकांना माफक रकमेत निवासाची व्यवस्था होईल.

या निर्णयांनाही मंत्रिमंडळाची मान्यता

धनगर समाजास नवी मुंबईतील खारघर नोड येथील सेक्टर ५ मधील भूखंड क्र. ४६ बी हा ४००० चौरस मीटर भूखंड देण्यात येणार

छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय तसेच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय

औद्योगिक विभागांमधील नागरी जमीन कमाल धारणा अन्वये सूट दिलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्क व व्याजासाठी अभय योजना

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील सावळी-सदोबा येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र या संस्थेचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रूपांतरण करण्यास मान्यता

राज्य उत्पादन शुल्क विभागात सहआयुक्त हे नवीन पद निर्माण करण्यास मान्यता, अवैध मद्य निर्मिती व विक्रीवर कारवाई करून नियंत्रण ठेवण्यासाठी पदाची निर्मिती

अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनांमधील ग्राहकांना वीज दर सवलतीस ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालकावर दोन वर्षांच्या आत अविश्वास प्रस्ताव दाखल करता येणार नाही,अशा सहकार विभागाच्या तरतुदीस मान्यता

वनहक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ 

 

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवारलोकसभा निवडणूक २०२४