Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:17 IST

मीरा भाईंदरमध्ये भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि शिंदेसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे.

भाईंदर - मुंबई पश्चिम उपनगरातील दहिसर ते मीरा भाईंदरच्या काशीगाव येथील मेट्रोचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, भाजपा आमदार नरेंद्र मेहता यासह इतर नेत्यांनी मेट्रोने प्रवास केला. त्यावेळी सगळेच कॅमेरे या नेत्यांचे दृश्य टिपत होते. परंतु त्याचवेळी घडलेल्या एका संवादाने अनेकांचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वारेमाप पैसा वापरला जातोय असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातो. त्यात प्रताप सरनाईक यांनी मेट्रो संवादात केलेले विधान चर्चेचा विषय ठरले आहे.

बोलण्याच्या ओघात मंत्री प्रताप सरनाईकांनी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या संपत्तीवरून भाष्य केले. मेट्रो प्रवासात सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत CM साहेब, मीरा भाईंदरमधील ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची असल्याचं सांगितले, त्यापैकी १० टक्के जागा ते मला द्यायला तयार आहेत असं सरनाईक म्हणाले. मात्र त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरनाईकांना आजूबाजूला सगळे कॅमेरे लागल्याची आठवण करून दिली. 

नरेंद्र मेहता यांनी सरनाईक बोलताना त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते परंतु थट्टामस्करीच्या मूडमध्ये असलेले सरनाईक यांनी त्यांना हवे ते बोलून मोकळे झाले. यावेळी मुख्यमंत्र्‍यांनीही फिरकी घेत आपण चकाला चकाला करू आणि इथे हे सगळं आपलं रेकॉर्ड करतील असं सांगताच सगळेच हसायला लागले. माध्यमांच्या कॅमेऱ्यात हा मिश्किल संवाद रेकॉर्ड झाला आणि तोच आता चर्चेचा विषय बनला आहे.

मेहता-सरनाईक यांच्यात वाद 

मीरा भाईंदरमध्ये भाजपा आमदार नरेंद्र मेहता आणि शिंदेसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. महापालिका निवडणुकीत हा वाद उफाळून आला होता. ठाणे, मुंबईत भाजपा-शिंदेसेना युती म्हणून लढत असली तरी मीरा भाईंदरमध्ये भाजपा आणि शिंदेसेना एकमेकांच्या विरोधात लढत होती. या निवडणुकीत सरनाईक आणि मेहता यांच्यातील शा‍ब्दिक वाद चांगलाच रंगला होता. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे उघडपणे काढले होते. त्यानंतर आज मेट्रो उद्घाटनानिमित्त हे दोन्ही नेते एकत्र आल्याचं दिसून आले.   

English
हिंदी सारांश
Web Title : Metro inauguration reveals Mehta's property claims, sparks political banter.

Web Summary : During the Metro inauguration, Pratap Sarnaik mentioned Narendra Mehta's property ownership in Mira Bhayandar, leading to humorous political exchange with CM Fadnavis. Their known rivalry was highlighted amidst the event.
टॅग्स :मेट्रोदेवेंद्र फडणवीसप्रताप सरनाईकएकनाथ शिंदेभाजपा