Join us
Daily Top 2Weekly Top 5

३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:03 IST

एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपाला ४० टक्के पुरुष, ४४ टक्के महिला यांनी पसंती दाखवली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ३३ टक्के पुरुष आणि ३१ टक्के महिलांनी मतदान केल्याचा अंदाज आहे.

मुंबई - महाराष्ट्रात २९ महापालिका निवडणुकीचं मतदान संपलं आहे. त्यात मुंबई महापालिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सकाळी ७.३० वाजता मुंबईत मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर काही ठिकाणी गोंधळ आणि शाई पुसली जात असल्याच्या आरोपावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. मात्र मतदान संपल्यानंतर मुंबईत कुणाची सत्ता येईल याबाबतचे काही एक्झिट पोल प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार भाजपामहायुतीच्या बाजूने लोकांनी कौल दिल्याचा अंदाज आहे.

DV रिसर्च या सर्व्हेनुसार मुंबईत सत्ता परिवर्तनाचे संकेत आहेत. त्यात भाजपा आणि शिंदेसेनेला १०७ ते १२२ जागा मिळू शकतात तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ६८ ते ८७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय काँग्रेस वंचित आघाडीला १८ ते २५ जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २-४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच इतरांच्या खात्यात ८ ते १५ जागा जातील असा अंदाज आहे. या इतरांमध्ये अपक्ष, समाजवादी पक्ष, एमआयएम यांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा आहेत त्यात बहुमताचा आकडा पार करण्यासाठी ११४ जागांची गरज आहे.

दुसरीकडे सकाळच्या एक्झिट पोलमध्येही महायुतीच्या बाजूने जनमत असल्याचं दिसले. त्यात महायुतीला १२२ जागा मिळतील असं बोलले जाते. भाजपा ८४, शिंदेसेना ३५, उद्धव ठाकरे ६५ आणि मनसेला १० जागा मिळतील असा अंदाज आहे. या पोलमध्ये काँग्रेस वंचित आघाडीला २० जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार भाजपाला ४० टक्के पुरुष, ४४ टक्के महिला यांनी पसंती दाखवली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ३३ टक्के पुरुष आणि ३१ टक्के महिलांनी मतदान केल्याचा अंदाज आहे. काँग्रेसला १३ टक्के महिला आणि पुरुष मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

दरम्यान, JVC एक्झिट पोलमध्येही महायुतीला १३८ जागा मिळतील असा अंदाज आहे. ४२ जागा असलेल्या मुंबई उत्तर विभागात भाजपाला २७-२८ जागा मिळतील त्याशिवाय  शिंदेसेना सुमारे ७-८ जागा मिळवेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४-५ जागा जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसला २-३ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर मनसे आणि इतर पक्षांना या भागात एकही जागा मिळणार नाही असा हा अंदाज आहे. वरील एक्झिट पोलनुसार मुंबईत सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता वर्तवल्याने ठाकरे बंधू यांना मोठा झटका बसेल असं चित्र दिसून येते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Exit Polls Predict BJP Victory in Mumbai Municipal Elections

Web Summary : Exit polls indicate a potential BJP-led Mahayuti victory in Mumbai's municipal elections. Surveys suggest BJP and Shinde's Sena could secure a majority, while the Thackeray factions face setbacks. Congress and NCP are projected to win fewer seats.
टॅग्स :महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६महायुतीभाजपाउद्धव ठाकरेराज ठाकरे