येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या एस.टी. बसेस घेणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 07:33 IST2025-01-28T07:01:03+5:302025-01-28T07:33:55+5:30
निकड लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने तत्त्वतः मान्यता दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या एस.टी. बसेस घेणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या लालपरी बसेस घेण्यास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक सोमवारी अजित पवार यांनी बोलवली होती. या बैठकीत एस.टी.च्या सद्य:स्थितीची माहिती मंत्री सरनाईक यांनी सादर केली. सध्या एसटी महामंडळाकडे केवळ १४ हजार ३०० बसेस आहेत. त्यात १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या १० हजार बसेस आहेत. या बसेस पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, दरवर्षी ५ हजार नवीन लालपरी बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार लालपरी बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आम्ही आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव बैठकीत मांडला. निकड लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने तत्त्वतः मान्यता दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले.