कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच; अपघातासह वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची होते नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:04 IST2025-07-22T13:01:37+5:302025-07-22T13:04:37+5:30

मुंबई : पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने ...

236 CCTVs watch on coastal; Accidents and vehicles exceeding speed limit are recorded | कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच; अपघातासह वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची होते नोंद

कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच; अपघातासह वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची होते नोंद

मुंबई : पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता म्हणजेच कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात आला आहे. त्यावर सुरक्षित वाहतूक व वेग मर्यादांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने ठिकठिकाणी लावलेले वैशिष्ट्यपूर्ण २३६ सीसीटीव्ही कॅमेरेदेखील आता कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे जलद वाहतुकीबरोबरच सुरक्षित वाहतुकीचीही सुविधाही आता कोस्टल रोडवर मिळणार आहे.

शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत १०.५८ किलोमीटर इतक्या लांबीचा हा किनारी रस्ता आहे. या प्रकल्पावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली आहे.  चार प्रकारचे वैशिष्ट्य असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे कोस्टल रोडवर कुठेही अपघात झाला तर नियंत्रण कक्षाला त्याची त्वरित माहिती मिळते आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध होऊ शकते. तसेच दिवसभरात किती वाहनांनी या मार्गाचा वापर केला, त्या वाहनांचे प्रकार कोणते, किती वाहनांनी वेगाची मर्यादा ओलांडली, याचीही नोंद या कॅमेरा प्रणालीद्वारे ठेवण्यात येत आहे.

असे आहेत कॅमेरे आणि त्यांची वैशिष्ट्ये
अपघात ओळखणारे कॅमेरे :
कोस्टल रोड प्रकल्पात जुळे बोगदे बांधण्यात आले आहेत. या बोगद्यांमधील आंतरमार्गिकांजवळ प्रत्येकी ५० मीटर अंतरावर अपघात ओळखणारे एकूण १५४ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बोगद्यांमधील कार अपघात, चुकीच्या दिशेने जाणारी वाहने इत्यादी घटनांची हे कॅमेरे नोंद करतात आणि त्याची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला देतात.

निगराणी कॅमेरे (पिटीझेड कॅमेरे) : दोन्ही भूमिगत बोगद्यांमध्ये वाहतूक सुरक्षेसाठी ७१ निगराणी कॅमेरे असून कॅमेरे चार दिशेला फिरवता येतात आणि झूमही करता येतात. जेव्हा अपघात होतो तेव्हा या कॅमेऱ्यामधील व्हीआयडीएस प्रणाली (व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्शन सिस्टम) स्वयंचलित पद्धतीने घटना ओळखते आणि त्याकडे लक्ष केंद्रित करते.

वाहन मोजणी कॅमेरे : बोगद्यांचे प्रवेश व निर्गमद्वारावर एकूण चार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहनांची संख्या मोजणे, त्यांचे वर्गीकरण करणे, हे काम या कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य आहे.

वाहन क्रमांक ओळखणारे कॅमेरे : वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अशी वाहने ओळखण्यासाठी सात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हा नियम मोडणाऱ्या वाहनांची छायाचित्रे व त्यांच्या वाहन क्रमांकाची नोंद हे कॅमेरे करतात.

मार्ग २४ तास सुरू ठेवण्याचे नियोजन
कोस्टल रोडवर वाहन चालकांकडून वेगमर्यादांचे पालन न करणे, आपापसांत शर्यती लावणे, आवाज नियंत्रणात न ठेवणे अशा तक्रारी स्थानिक नागरिक वारंवार करत होते. मात्र नवीन सीसीटीव्ही प्रणालीमुळे महापालिका आणि वाहतूक पोलिसांना अशा नियमबाह्य प्रकारांवर नियंत्रण ठेवता येईल. त्यातूनच आता हा महामार्ग २४ तास सुरू ठेवण्याचे महानगरपालिका प्रशासनाने नियोजन आहे.

Web Title: 236 CCTVs watch on coastal; Accidents and vehicles exceeding speed limit are recorded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.