राज्याच्या २,११२ कोटींच्या जिल्हा सक्षमीकरणास, केंद्र सरकारची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 12:03 IST2023-08-01T12:03:04+5:302023-08-01T12:03:58+5:30
यासाठी १,४७८ कोटी रुपये अर्थसाहाय्य जागतिक बँक देणार असून, उर्वरित हिस्सा राज्य सरकार देणार आहे.

राज्याच्या २,११२ कोटींच्या जिल्हा सक्षमीकरणास, केंद्र सरकारची मंजुरी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेकडे ‘मित्रा’मार्फत सादर केलेल्या जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रमाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. २,११२ कोटी रुपयांचा हा कार्यक्रम आहे. यासाठी १,४७८ कोटी रुपये अर्थसाहाय्य जागतिक बँक देणार असून, उर्वरित हिस्सा राज्य सरकार देणार आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या या मंजुरीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये क्षमता ओळखून त्यानुसार गुंतवणूक, त्यासाठी अंमलबजावणी आणि देखरेख प्रणाली विकसित करणे आणि त्यातून जिल्ह्यांमध्ये शाश्वत विकासाच्या संधी निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.