मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 06:33 IST2025-12-01T06:32:10+5:302025-12-01T06:33:30+5:30
मध्य रेल्वेच्या परळ, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), कल्याण आणि पनवेल या चार महत्त्वाच्या स्टेशनवर पुढील पाच वर्षात प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
मुंबई : मध्य रेल्वेवर येत्या काही २० नवीन प्लॅटफॉर्म वर्षामध्ये उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. अतिरिक्त प्लॅटफॉर्ममुळे लोकलसह कोकणात तसेच भारतातील इतर भागांमध्ये जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेसची संख्या वाढविण्यास मदत होणार असून, येत्या काळात महा मुंबईतला रेल्वेचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
मध्य रेल्वेच्या परळ, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), कल्याण आणि पनवेल या चार महत्त्वाच्या स्टेशनवर पुढील पाच वर्षात प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व स्टेशनची क्षमता वाढविण्यासाठी सध्या विविध विकासकामे सुरू आहेत. तर काही कामे प्रस्तावित आहेत. वाढती लोकसंख्या आणि लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या ट्रेनची संख्या वाढण्याचा मार्ग मोकळा होईल.
परळ टर्मिनसचा वापर
रेल्वे अर्थसंकल्प २०२५ मध्ये परळला टर्मिनस म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, परळ टर्मिनस हे कुर्ला आणि परळदरम्यानच्या नवीन पाचव्या, सहाव्या मार्गाशी जोडले जाईल, ज्याचा वापर मेल, एक्स्प्रेस ट्रेनसाठी होईल.
अमृत भारत स्टेशन विकास प्रकल्पांतर्गत परळची पुनर्रचना केली आहे. अतिरिक्त प्लॅटफॉर्ममुळे येथे मेल, एक्स्प्रेस चालविण्यास मदत मिळणार आहे.
पनवेल स्थानकावर पाच प्लॅटफॉर्म उभारणार
परळसह एलटीटीमध्ये चार नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याची योजना आहे. हे स्थानक प्रामुख्याने उत्तर भारतात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी मुख्य टर्मिनल आहे आणि नवीन प्लॅटफॉर्म सुविधेमुळे शहरांतर्गत आणि एक्स्प्रेस गाड्यांची संख्या वाढवता येणार आहे.
त्याचप्रमाणे, वेगाने विकसित 3 होत असलेल्या पनवेल स्थानकावर पाच नवीन प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो नेटवर्कसह पनवेल एक प्रमुख वाहतूक इंटरचेंज बनण्यास सज्ज होणार असून, या ठिकाणावरून कोकणसाठी ट्रेनची संख्या वाढविणे शक्य होणार आहे.
असे वाढणार प्लॅटफॉर्म
परळ - ५
कल्याण - ६
एलटीटी - ४
पनवेल - ५