महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 05:46 IST2025-12-04T05:45:54+5:302025-12-04T05:46:49+5:30
तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाख रुपयांची बँक हमी जप्त करण्यात आली आहे. बंद करण्यात आलेल्या प्लांटमध्ये ठाणे येथील ८, नवी मुंबई येथील ६, तर कल्याण येथील एका आरएमसी प्लांटचा समावेश आहे.

महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १९ आरएमसी प्लांट (रेडी मिक्स काँक्रीट) बंद केले आहेत. देवनार, गोवंडी येथील ओम गेहलोत ऑपरेटर, एनसीसी, रामकी इन्फ्रास्ट्रक्चर, एनए कन्स्ट्रक्शन या चार ‘आरएमसीं’चा यात समावेश आहे. यातील तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाख रुपयांची बँक हमी जप्त करण्यात आली आहे. बंद करण्यात आलेल्या प्लांटमध्ये ठाणे येथील ८, नवी मुंबई येथील ६, तर कल्याण येथील एका आरएमसी प्लांटचा समावेश आहे.
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये मंडळाची ३२ ठिकाणी वायुगुणवत्ता निरीक्षण केंद्रे सुरू आहेत. त्यांपैकी १४ केंद्रे मुंबईत आहेत; तर उर्वरित केंद्रे ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल येथे आहेत. याद्वारे हवा गुणवत्ता निर्देशांक मोजला जातो. तो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर ‘समीर ॲप’मार्फत प्रसारित केला जातो.
हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी मंडळाकडे एकूण २२ मोबाइल मॉनिटरिंग व्हॅन आहेत. ज्याद्वारे राज्यामध्ये गरजेनुसार वातावरणीय हवा गुणवत्ता तपासणी केली जाते. व्हॅनचा उपयोग हवाप्रदूषण, हॉटस्पॉट क्षेत्रे तसेच आरएमसी आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये हवाप्रदूषण तपासणीसाठी केला जातो. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कारवाई केली जाते.
कारवाईवर दृष्टिक्षेप
सायनमधील संजय गांधी नगर येथील तीन अनधिकृत मेटल प्रोसेसिंग भट्ट्या असलेल्या उद्योगांना कारखाना बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने महापालिकेमार्फत भट्ट्या पाडण्यात आल्या.
वडाळा-माहुल येथील सर्वेक्षणादरम्यान एमबीपीटी रस्त्याच्या कडेने काही ठिकाणी संध्याकाळी कचरा जाळला जात होता. याबाबत उपाययोजना करण्याकरिता मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाला निर्देश देण्यात
आले आहेत.
ऑक्टोबरमध्ये राज्यातील आरएमसी प्लांटकरिता मंडळाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्याच्या अंमलबजावणीचे सर्वेक्षण अधिकाऱ्यामार्फत सुरू आहे. सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने कारवाई केली जात आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी विशेष मोहीम
वायुप्रदूषण नियंत्रणासाठी मोहीम हाती घेतली आहे. नियम पाळणार नाहीत, अशा उद्योगांवर बंदची कारवाई करण्यात येत आहे. सर्वेक्षण मोहीम सुरूच राहील. वायुप्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई केली जाईल. मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह हे दैनंदिन सर्वेक्षणाचा अहवाल घेत आहेत. उद्योगाने सहकार्य करावे. -सिद्धेश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ