आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:04 IST2026-01-02T17:03:53+5:302026-01-02T17:04:45+5:30
Thackeray Sena-MNS Manifesto BMC Election 2026: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन मुंबईचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दादर येथील शिवसेना भवनात आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत विकासाचा आराखडा सादर केला.

आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
Mumbai Municipal Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक वेगळे चित्र पाहायला मिळाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांनी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन मुंबईचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दादर येथील शिवसेना भवनात आमदार आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबईकरांसाठी १६ कलमी विकासाचा आराखडा सादर केला. "हा केवळ जाहीरनामा नसून ठाकरेंचा शब्द आहे," अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी मुंबईकरांना साद घातली.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे मुंबईचा विकास आराखडा मांडला. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळई आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी महायुतीवर देखील निशाणा साधला. मुंबईत शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलो आहोत. आपण काय ताकदीने लढत आहोत हे माहिती आहे. समोरच्यांकडून साम दाम दंड भेद वापरलं जात आहे, आमच्याकडे तन, मन आहे, आणि धन त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे असल्याने धनाचा वापर होणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
"मला सर्वांचे आभार मानायचे आहेत. कार्यालय फोडलं नाही, एबी फॉर्म गिळला नाही, शिवीगाळ केली नाही, मारामारी केली नाही. सर्वांनी समजून घेतलं. ही निष्ठा असते. हाच आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे," असा टोला अमित ठाकरे यांनी लगावला.
मुंबईकरांसाठी प्रमुख घोषणा
मालमत्ता कर माफी: आतापर्यंत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी होती, ती वाढवून आता ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
स्वाभिमान निधी: मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये स्वाभिमान निधी दिला जाणार आहे.
मोफत वीज व पाणी: घरगुती वापरासाठी १०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, तसेच पाण्याचे दर स्थिर ठेवून प्रत्येकाला शुद्ध पाणी देण्याचे वचन दिले आहे.
बेस्ट प्रवास: बेस्ट बसचे तिकीट दर अत्यंत कमी करून ५, १०, १५ आणि २० रुपये असे केले जातील.
शिक्षण आणि आरोग्यासाठी मास्टर प्लॅन
ज्युनिअर कॉलेज: महापालिकेच्या शाळांमध्ये आता १० वी नंतर ज्युनिअर कॉलेज सुरू केली जातील, जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी खासगी महाविद्यालयांची पायरी चढावी लागणार नाही.
आरोग्य सेवा: मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅन्सर रुग्णालय आणि ५ नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारली जातील. महिलांसाठी दर २ किलोमीटरवर अत्याधुनिक स्वच्छतागृहे असतील.
पाळणाघर: नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उत्कृष्ट पाळणाघर सुरू करण्यात येईल.
युवा मुंबई आणि स्वयंरोजगार
स्वयंरोजगार निधी: १ लाख तरुण-तरुणींना २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचा स्वयंरोजगार सहायता निधी दिला जाईल.
ई-बाईक: २५ हजार गिग वर्कर्स आणि डबेवाल्यांना ई-बाईक घेण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल.
क्रीडा संकुल: प्रत्येक वॉर्डात 'मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' आणि अत्याधुनिक व्यायामशाळा उभारल्या जातील.
मुंबईचा स्वाभिमान आणि भूमी
बीपीटीची जागा: "मुंबईची जमीन मुंबईकरांसाठीच" हा नारा देत, बीपीटीच्या १८०० एकर जमिनीवर केंद्र सरकारचा अधिकार मोडीत काढून तिथे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
परवडणारी घरे: महापालिकेच्या जमिनी बिल्डरांना न देता तिथे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि मुंबईकरांसाठी ५ वर्षांत १ लाख परवडणारी घरे बांधली जातील.
मुंबईकर तरुणांसाठी
प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अत्याधुनिक व्यायामशाळा, जुन्या व्यायामशाळांची दुरुस्ती. मुंबईतल्या कॉन्सर्ट्स-क्रिकेट सामन्यांसाठी १ टक्के आसनं तरुण मुंबईकरांसाठी लॉटरीच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करुन देणार.
पाळीव पशूंसाठी
पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट अॅम्ब्युलन्स आणि पेट क्रेमॅटोरियम.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील सर्वात मोठे भव्य ग्रंथालय उभारण्याची महत्त्वाची घोषणाही या प्रसंगी करण्यात आली.