12 people lost their lives during a train trip | रेल्वे प्रवासात दिवसभरात १२ जणांनी गमावला जीव
रेल्वे प्रवासात दिवसभरात १२ जणांनी गमावला जीव

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकल प्रवासात दररोज अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व येते. यामुळे मुंबईची ही जीवनवाहिनी जीवघेणी ठरत असल्याचे दिसून येत आहे. रविवार, २१ एप्रिल रोजी विविध रेल्वे अपघातांत तब्बल १२ प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागला, तर ७ प्रवासी जखमी झाले आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि इतर गर्दीची स्थानके मृत्यूचा सापळा बनत आहेत. या स्थानकांवर दर दिवशी अपघातात एक ते तीन जणांचा जीव जातो. याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी, बोरीवली स्थानकांवर अपघाती मृत्यूचा आकडा वाढता आहे. रविवारी विविध स्थानकांवर गर्दीच्या ट्रेनमधून तोल जाऊन, रूळ ओलांडताना तसेच अन्य कारणांमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात प्रवासी जखमी झाले असून जखमींवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट यांची उभारणी करण्यात येत आहे. रेल्वे रुळालगत उंच भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र या सुविधा कमी पडत असल्याचे दिसून येत असून अपघात घडतच आहेत. कधी रूळ ओलांडताना तर कधी गर्दीच्या ट्रेनमध्ये लोंबकळत प्रवास करताना तोल जाऊन मृत्यू होण्याच्या घटना घडतच आहेत, अशी प्रतिक्रिया प्रवासी प्रमोद जाधव यांनी दिली.
तर, दररोजची गर्दी, रेल्वेचे बिघडलेले वेळापत्रक, अनियोजित मेगाब्लॉक यामुळे लोकलमध्ये गर्दीचा ताण वाढतो. परिणामी, धावत्या लोकलमधून पडणे, खांब लागणे अशा घटना घडत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रवासी मयूर पवार यांनी दिली.

समस्या सोडवा मेसेजद्वारे; पश्चिम रेल्वे मार्गावरील मेल, एक्स्प्रेसमधील प्रवाशांसाठी विशेष सुविधा
पश्चिम रेल्वे मार्गावरील मेल, एक्स्प्रेसमधील प्रवाशांना अनेक वेळा अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची कमतरता दिसून येते. अशा वेळी प्रवाशांना तक्रार कुठे करायची, असा प्रश्न पडतो. मात्र, पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना मोबाइलद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘कोच मित्रा सर्व्हिसेस’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाद्वारे प्रवासी मोबाइलवरून मेसेज करून, रेल्वे प्रशासनाकडे तक्रार दाखल करू शकतात. ९२००००३२३२ या क्रमांकावर प्रवासी मेसेज करू शकतात. यासह तक्रार करताना आपली समस्या, पीएनआर क्रमांक मेसेज करावा लागतो.
याद्वारे पाण्याची मागणी, पँट्री रिपेरिंग, साफसफाई यांची तक्रार करून तत्काळ रेल्वे प्रशासन ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तक्रार करण्यासाठी सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटवरून देण्यात आली आहे.

२०१८ मध्ये २ हजार ९८१ जणांचा बळी
2018 साली मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरून विविध रेल्वे अपघातात २ हजार ९८१ प्रवाशांचा मृत्यू झाला.
1,619 प्रवाशांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला आहे. एकूण अपघातांपैकी मध्य रेल्वे मार्गावर १ हजार ९३३ प्रवाशांचा मृत्यू आणि १ हजार ९२० प्रवासी जखमी झाले आहेत.
1,048 प्रवाशांचा मृत्यू पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवासादरम्यान आणि १ हजार ४२९ प्रवासी जखमी झाले आहे.


Web Title: 12 people lost their lives during a train trip
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.