100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, मुंबईत बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 17:00 IST2021-12-29T16:58:48+5:302021-12-29T17:00:04+5:30
भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून म्याव म्याव केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे

100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, मुंबईत बॅनरबाजी
मुंबई - सिंधुदुर्गात शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतरच्या वादाचे पडसाद मुंबईतही उमटताना दिसून येत आहेत. त्यातच, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांनी नोटीस बजावली आहे. आता, दादर येथे नितेश राणे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी तात्काळ ते बॅनर खाली उतरवले आहेत.
भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून म्याव म्याव केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. विधीमंडळातील सभागृहात याचे पडसाद उमटल्याचं दिसून आलं. त्यानंतर, आता सभागृहाबाहेरही शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये सामना रंगल्याचं दिसून येत आहे. त्यातच, संतोष परब हल्लाप्रकरणातून चांगलाच वाद रंगला आहे.
आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग न्यायालयात आज सुनावणी होत आहे. तत्पूर्वीच कणकवली पोलिसांनी मंत्री नारायण राणेंना नोटीस बजावली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? हे कुणालाही माहीत नाही.
दादर परिसरातील राणे समर्थकांनी नितेश राणेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली होती. त्यामध्ये, 100 कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करू शकत नाहीत, असा आशय लिहिण्यात आला होता. विशेष म्हणजे या बॅनरवर केंद्रीयमंत्री नारायण राणेंचाही फोटो झळकला आहे. या बॅनरबाजीसंदर्भात माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे बॅनर खाली उतरवले आहेत. दरम्यान, या बॅनरबाजीमुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.