४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वाचविण्यास १० वकील मैदानात, पार्थ पवारांच्या अमेडियाने दुसऱ्यांदा मागितली मुदतवाढ, आज होणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:58 IST2025-11-25T09:58:39+5:302025-11-25T09:58:49+5:30
Pune News: मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने हा व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मागितली आहे.

४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वाचविण्यास १० वकील मैदानात, पार्थ पवारांच्या अमेडियाने दुसऱ्यांदा मागितली मुदतवाढ, आज होणार निर्णय
पुणे - मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने हा व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मागितली आहे. यासाठी कायदेशीरदृष्ट्या बाजू मांडण्यासाठी तब्बल १० वकिलांची फौज तैनात करण्यात आली आहे. याबाबत आज (मंगळवारी) निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाची चाळीस एकर जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने परस्पर खरेदी केल्यानंतर या जागेच्या गैरव्यवहाराचे राज्यात मोठे पडसाद उमटले होते. यानंतर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने कंपनीला पहिली नोटीस ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ७ नोव्हेंबरला बजावली होती. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी १६ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत पंधरा दिवस वाढवून द्यावी, असा अर्ज कंपनीने १४ नोव्हेंबरला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे केला होता. त्यानंतर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाने आठ दिवसांची मुदतवाढ देऊन २४ नोव्हेंबरपर्यंत ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क भरण्याबाबतची नोटीस जारी केली होती. सोमवारी ही मुदत संपली असून आज यावर निर्णय होणार आहे.
सह जिल्हा निबंधक यांच्याकडे केला अर्ज
अमेडिया कंपनीला बुडविलेले मुद्रांक शुल्क भरण्यासाठी याआधीही मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा कंपनीने पंधरा दिवसांची मुदत वाढवून देण्याबाबतचा अर्ज मुद्रांक शुल्क विभागाचे सह जिल्हा निबंधक यांच्याकडे दिला आहे. या जमीन व्यवहारप्रकरणी ४२ कोटी मुद्रांक शुल्क भरावेच लागणार आहे, अशी माहिती मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.