Join us
Daily Top 2Weekly Top 5

"गावा-खेड्यातून आलेले माझे भाऊ आणि...", 'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयसची भावुक पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 08:49 IST

'चल भावा सिटीत' शो संपताच श्रेयस तळपदेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय.

'झी मराठी' वाहिनीवर गेल्या १५ मार्च रोजी 'चल भावा सिटीत' हा नवीन कार्यक्रम सुरू झााला होता. या कार्यक्रमात १३ सिटीसुंदरी आणि १२ गावरान ब्रो सहभागी झाले होते. या शोमध्ये ग्रामीण आणि शहरी जीवनशैलीचा संगम दाखवण्यात आला. जिथे विविध जोड्यांनी एकमेकांच्या संस्कृतींना समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता रविवारी १ जून रोजी 'चल भावा सिटीत' चा महाअंतिम सोहळा पार पडला. पहिल्या पर्वाच्या अंतिम फेरीत अथर्व-रेवती, विजय-अनुश्री, ऋषिकेश-श्रुती, दिपक-प्रणाली आणि रामा-नीता या पाच जोड्या पोहोचल्या होत्या. यापैकी श्रुती राऊळ आणि ऋषिकेश चव्हाण या जोडीने पहिल्या पर्वाचं विजेतेपद पटकावलं. विशेष म्हणजे या शोचं अभिनेता श्रेयस तळपदेने सूत्रसंचालन केलं होतं. आता शो संपल्यानंतर श्रेयस भावुक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

श्रेयस तळपदेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "आणि मित्रांनो अशा प्रकारे आपल्या 'चल भावा सिटीत'ची सांगता होत आहे.. ज्या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले, उत्कृष्ट प्रतिसाद दिला, न चुकता शो पाहिला.. त्यांचे मी सर्व प्रथम आभार मानतो. तुमच्या प्रेमामुळे, पाठिंब्याने आम्हाला उत्तम काम करण्याची स्फूर्ती येते. या कार्यक्रमातून प्रत्येक जण काही न काही शिकवण घेऊन जात आहे. ज्यात मी ही शिकलो की 'चांगले सादरीकरण करणेच असा एकच हेतू घेऊन ते साध्य करण्यासाठी मिळून काम केले तर घडणारी कलाकृती ही उत्तमच होते".

श्रेयसने पुढे लिहलं, "गावा खेड्यातून आलेले माझे भाऊ आणि या शहरातल्या मुलींनी प्रत्येकाने अनोखे योगदान दिले. ज्यामुळे सेटवर कायम एक नाविण्य आणि ऊर्जा टिकून राहते. जाता जाता त्यांचे ही आभार मानेन जे दिसत नाहीत, पण मेहनत तितकीच घेत असतात. सर्व पडद्यामागच्या कलाकारांचे ही खूप खूप आभार", या शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या.

यासोबतच श्रेयसनं प्रेक्षकांना दुसरा सीझन हवाय का, याबद्दलही चाहत्यांना विचारलं. पोस्टच्या शेवटी त्यानं लिहलं, "'चल भावा सिटीत'चे आणखी एक धम्माल पर्व घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला यायचे का? सिटीत गाव गाजतंय पर्व दुसरे बद्दल तुम्हाला काय वाटतंय? मला नक्की सांगा!". श्रेयसच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्यात.

 

टॅग्स :श्रेयस तळपदेझी मराठी