Join us

महिलांवर अश्लील भाष्य करणं भुवन बामच्या आलं अंगाशी, मागावी लागली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 19:01 IST

लोकप्रिय युट्यूबर भुवन बाम (Bhuvan Bam) त्याच्या नवीन व्हिडीओमुळे अडचणीत आला आहे.

लोकप्रिय युट्यूबर भुवन बाम (Bhuvan Bam) त्याच्या नवीन व्हिडीओमुळे अडचणीत आला आहे. व्हिडीओमध्ये पहाडी महिलांवर त्याने केलेल्या भाष्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW)  अॅक्शन घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. तसेच महिला आयोगाने भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाला भुवन बामवर कारवाई करण्यास सांगितले आहे. महिला आयोगाच्या कारवाईनंतर भुवनने आता जाहीरपणे माफी मागितली आहे.

भुवन बामने नुकतेच त्याच्या यूट्यूब चॅनल 'बीबी की वाइन्स'वर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यांनतर तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भुवनने 'ऑटोमॅटिक बाईक' या शीर्षकासह एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्यामध्ये पहाडी महिलांवर अश्लील कमेंट करण्यात आली आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर १२ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतरच अनेकांनी भुवनवर ट्रोल केले होते. हे प्रकरण वाढत जाऊन राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांना भुवन बामविरोधात एफआयआर नोंदवण्याची विनंती केली होती.

भुवन बामने मागितली माफी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या पोस्टनंतर भुवन बामने जाहीरपणे माफी मागितली आहे. त्याने म्हटले की, 'माझ्या व्हिडिओच्या त्या भागामुळे काही लोकांचे मन दुखावल्याची माहिती मला मिळाली आहे. मी व्हिडिओ एडिट करून तो भाग काढून टाकला आहे. जे मला ओळखतात त्यांनाही माहीत आहे की मी महिलांचा किती आदर करतो. या व्हिडीओद्वारे कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी सर्वांची माफी मागतो' 

टॅग्स :यु ट्यूब